वसई तालुक्याचा ग्रामीण भाग आता कोरोनामुक्तीच्या मार्गावर; आरोग्य यंत्रणेचे नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 12:29 AM2020-12-04T00:29:45+5:302020-12-04T00:29:57+5:30
अवघ्या १० जणांवर उपचार सुरू
पारोळ : वसई तालुक्यातील नागरिक दिवाळी उत्सवात खरेदीसाठी घराबाहेर पडल्याने दिवाळीनंतर कोरोना महामारीची मोठी लाट येईल, अशी भीती व्यक्त होत होती. पण दिवाळीनंतर वसई ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणात असल्याचे दिसत असून आता कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होत असल्याने मृत्युदरही शून्यावर आला आहे. यामुळे वसईचा ग्रामीण भाग कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे.
वसई ग्रामीण भागात सध्या फक्त १० बाधितांवर उपचार सुरू असून लवकरच तेसुद्धा बरे होतील, अशी आशा व्यक्त होत आहे. मागील १८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या १४ दिवसांच्या कालावधीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसल्याची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे. ही माहिती वसई ग्रामीण भागासाठी दिलासा देणारी ठरली आहे. तसेच मागील १४ दिवसांत ग्रामीण भागात केवळ ४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने खाली आल्याने ग्रामीण भागातील जनतेने आता सुस्कारा सोडला आहे. लवकरच ग्रामीण भागात कोरोनाला हरवण्यात यश मिळेल आणि कायमस्वरूपी कोरोना या भागातून गाशा गुंडाळेल, अशी आशा नागरिकांना वाटते.
वसई शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागल्यानंतर जून महिन्यात कोरोनाने वसई ग्रामीण भागात शिरकाव केला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापर्यंत ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने नागरिकांना धास्ती वाटत होती. कोरोनाचा आकडा हजारीपार गेल्यानंतर ग्रामीण भागातदेखील कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला होता. मात्र जसजसे लॉकडाऊन शिथिल झाले, तसतसे येथील व्यवहार रुळावर येत गेले. व्यवहार रुळावर आल्यानंतर ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला होता. मात्र ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा प्रभाव ग्रामीण भागातून कमी होत गेला. आता वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असताना ग्रामीण भाग मात्र कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करतो आहे.
लवकरच हद्दपार
दिवाळीनंतर दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सज्ज झाली होती. ग्रामीण भागातून लवकरच कोरोना हद्दपार होईल, असा विश्वास बाळगला जात आहे.