साखरे धरणाची सुरक्षा रामभरोसे; महाराष्ट्र जीवन प्रधिकरण उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:19 PM2020-02-24T23:19:13+5:302020-02-24T23:19:23+5:30
संरक्षक भिंत, सुरक्षारक्षक नाहीत
डहाणू : डहाणू तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील अणुशक्ती केंद्र्र, एमआयडीसी तारापूर, तसेच बी.ए.आर.सी., डहाणू थर्मल पॉवर स्टेशन या मोठ्या प्रकल्पांना दररोज लाखो लीटर्स पाणीपुरवठा करणाऱ्या वाणगांवच्या साखरे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. साखरे धरणाची सुरक्षा तसेच देखभाल दुरूस्तीची जबाबदारी असलेले महाराष्टÑ जीवन प्रधिकरण याबाबत कोणतीच खबरदारी घेत नसल्याने धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे.
तारापूर येथील वीजनिर्मिती करणाºया तारापूर अणूशक्ती केंद्राला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने शासनाने वाणगाव जवळील साखरे गावात मोठे धरण बांधले आहे. एकूण पाचशे मीटर लांबी असलेले हे धरण वाणगाव - वधना या राज्यमार्गाला लागून आहे. या धरणाच्या आजुबाजुला मोठमोठे डोंगर आहेत. धरण परिसर खूप मोठा असला तरी कुठेही संरक्षक भिंत नाही. धरणाचे एक प्रवेशद्वार रात्रंदिवस उघडेच असते. तेथे रखवालदार किंवा सुरक्षारक्षक नसल्याने कोणतेही वाहन किंवा अज्ञात व्यक्ती थेट धरण क्षेत्रात प्रवेश करतात. मार्च, एप्रिल, मे, जून महिन्यात तर धरण परिसर पर्यटकांनी गजबजलेला असतो. तरुणाई येथे पार्ट्या करते. तर मद्यधुंद अवस्थेत धरणात उतरून मजा करीत असतात. गेल्या वर्षी एका तरूणाचा बुडून मृत्यू झाला. याशिवाय, या धरणात वीस - पंचवीस वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाण्यापेक्षा गाळ, केरकचरा मोठ्या प्रमाणात असून त्याच्या देखभाल दुरूस्तीकडे महाराष्टÑ जीवन प्रधिकरण दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नुकतेच या धरणापासून २५० मीटर अंतरावर तारापूर येथील एका कंपनीच्या टँकरमधून घातक रसायन टाकल्याचे व्हीडिओ व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. आठ, दहा दिवस तर ग्रामस्थांनी पाणीही भरले नव्हते. याबाबत वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे.
चार - पाच वर्षांपासून साखरे धरणाजवळ मोठ्या प्रमाणात पार्ट्या होतात. पावसाळ्याच्या दिवसांत तर आसपासच्या परिसरातील शेकडो तरूण धरणात उतरून मौजमजा करतात. तसेच बिअरच्या रिकाम्या बाटल्याही पडलेल्या दिसतात. सुरक्षेच्या दृष्टीने जीवन प्रधिकरण उपाययोजना करीत नसल्याने भविष्यात येथे घातपाताची भीती ग्रामस्थ व्यक्त करतात.