साहिल बेपत्ताच, लालबागच्या राजाच्या विसर्जनात समुद्रात बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 03:46 AM2018-09-26T03:46:20+5:302018-09-26T03:46:39+5:30

लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्या दरम्यान गिरगाव चौपाटी समोरील समुद्रात बोटीला झालेल्या अपघातात सोमवारी पाण्यात पडलेल्या घिवली गावातील साहिल जयेश मरदे या ५ वर्षीय मुलाचा दोन दिवस झाले तरी अजून थांगपत्ता लागलेला नाही.

 Sahil disappears, immersed in the sea by the Lalbaghcha raja | साहिल बेपत्ताच, लालबागच्या राजाच्या विसर्जनात समुद्रात बुडाला

साहिल बेपत्ताच, लालबागच्या राजाच्या विसर्जनात समुद्रात बुडाला

googlenewsNext

पालघर : लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्या दरम्यान गिरगाव चौपाटी समोरील समुद्रात बोटीला झालेल्या अपघातात सोमवारी पाण्यात पडलेल्या घिवली गावातील साहिल जयेश मरदे या ५ वर्षीय मुलाचा दोन दिवस झाले तरी अजून थांगपत्ता लागलेला नाही. त्याचे संपूर्ण कुटुंब, मच्छिमारांसह त्याचा शोध घेत आहेत. त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने त्याच्या शोध घेण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र पथके नेमावित अशी मागणी घिवली ग्रामस्थामधून केली जात आहे.
लालबागच्या राजाच्या दर्शनाची आस गणेशभक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात असते. त्याचे विसर्जन सकाळ पर्यंत सुरू असल्याचे माहीत असल्याने तारापूर जवळील घिवली गावातील जयेश मरदे हे आपली पत्नी नीता, मुलगी त्रिवेणी (१० वर्ष) आणि मुलगा साहिलसह अनंतचतुर्दशीला (रविवारी) कफपरेडला पोचले. सकाळी लवकर उठून साहिल आपले बाबा, आई आणि बहिणीसह आपल्या मामाच्या राजधानी बोटीत जाऊन बसला. ही बोट चौपाटीवर पोचल्यानंतर सुमारे ८.४५ च्या सुमारास लालबागच्या गणपतीचा विसर्जन सोहळा पाहत असताना शेजारच्या बोटीशी टक्कर झाल्याने ही बोट उलटली. त्यामुळे बोटीतील सर्व माणसे पाण्यात बुडाली. याच वेळी नीता हिने प्रसंगावधान राखीत पाण्यात बुडत असलेल्या आपल्या मुलीच्या केसाला पकडून ठेवले. तर आपल्याला बिलगलेल्या साहिल यालाही घट्ट पकडून ठेवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी लोकमतला सांगितले. ही बोट पाण्यात उलटल्यानंतर एकच आरडाओरड होत अनेकांनी मदतीसाठी पाण्यात उड्या घेतल्या. या दरम्यान आपल्या हातातील मुलाला कुणीतरी घेतल्याचे त्याच्या आईचे म्हणणे आहे. मात्र या घटनेला २४ तासाचा अवधी लोटल्या नंतर ही साहिलचा शोध लागला नसल्याने मरदे कुटुंबीय आणि घिवली गावाला दु:खाने ग्रासले आहे. आपल्या मुलाचा शोध घेण्याबाबत पोलीस आणि प्रशासनाकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याचे त्याच्या वडिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे साहिलला कोणी चोरून नेले? की त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला? या बाबत काहीही कळत नसल्याने साहिलच्या आईचे अश्रू अविरत झरत आहे.

प्रशासन आणि पोलिसांनी साहिलच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी करून, समुद्रात त्याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तात्काळ उभारायला हवी. आज दोन दिवस झाले तरी त्यांना अजून जाग कशी येत नाही?
- नयन तामोरे, ग्रामस्थ, घिवली

Web Title:  Sahil disappears, immersed in the sea by the Lalbaghcha raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.