वसई महापालिका कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदानासाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 11:26 PM2020-10-31T23:26:59+5:302020-10-31T23:27:13+5:30
Vasai-Virar Municipal Corporation : वसई-विरार महानगरपालिकेची दि. २८ जून रोजी मुदत संपल्याने तेव्हापासून प्रशासक नियुक्त करण्यात आला असल्याने या वेळी सानुग्रह अनुदान मिळणार की नाही, असा गंभीर प्रश्न कर्मचारीवर्गाला पडला आहे.
वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेतील कर्मचारी वर्गाला या वर्षी सानुग्रह अनुदान मिळणार की नाही, अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या अधिकारी-कर्मचारी संघटनेने दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळावे याकरिता बविआ अध्यक्ष तथा वसईचे आ. हितेंद्र ठाकूर आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. यांना साकडे घातले आहे.
वसई-विरार महानगरपालिकेची दि. २८ जून रोजी मुदत संपल्याने तेव्हापासून प्रशासक नियुक्त करण्यात आला असल्याने या वेळी सानुग्रह अनुदान मिळणार की नाही, असा गंभीर प्रश्न कर्मचारीवर्गाला पडला आहे. दिवाळी सण तोंडावर आला असताना कोरोनाच्या काळात पालिका कर्मचारीवर्गाने दिवस-रात्र काम केले असून त्याची दखल महापालिका प्रशासनाने घ्यावी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने सानुग्रह अनुदान मंजूर करावे, या मागणीसाठी वसई-विरार महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेने महापालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. व वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या दोघांनाही मागणीबाबतचे निवेदन सादर केले आहे.
लोकप्रतिनिधींच्या काळात कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान व्यवस्थितपणे मिळत होते. त्यामुळे या वेळीही हे अनुदान मिळावे, अशी मागणी अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने केली आहे.
महापालिका आयुक्त गंगाथरन डी. आणि आ. हितेंद्र ठाकूर यांना भेटलेल्या कर्मचारी वर्गातील शिष्टमंडळात अध्यक्ष सुधाकर संखे, संजू पाटील, खजिनदार स्मिता भोईर, मेरी डाबरे, कल्पेश पाटील, उमेश म्हसणेकर होते. या वेळी आ. हितेंद्र ठाकूर यांनी कोरोनाच्या काळात कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आणि आपण या प्रश्नात नक्कीच लक्ष घालू असे सांगितले.
आयुक्तांच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष
माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनीही कर्मचाऱ्यांनी कोरोनासारख्या महामारीच्या काळात चांगले काम केले असून त्यांना इतर महापालिकांप्रमाणेच अनुदान देण्याची मागणी आयुक्तांकडे केली असल्याचे स्पष्ट केले. आता आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाबाबतीत कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.