बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 07:30 AM2024-05-01T07:30:57+5:302024-05-01T07:31:17+5:30
२०२१ साली १७ वर्षीय मुलीचे ओळखीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत मुलीवर अनेकदा बलात्कार केला.
नालासोपारा : लग्नाच्या बहाण्याने दोन तरुणांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. यातून जन्माला आलेल्या बाळाची आरोपीने विक्री केली. आरोपीला पीडितेचे आई- वडील, डॉक्टरसह एका माजी नगरसेविकेनेही साथ दिल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात उघडकीस आली आहे. बलात्कारामुळे पीडित मुलगी दोन वेळा गर्भवती राहिल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी १६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपीला अटक केली आहे.
२०२१ साली १७ वर्षीय मुलीचे ओळखीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत मुलीवर अनेकदा बलात्कार केला. यातून मुलगी गर्भवती राहिल्याचे समजताच त्याने पळ काढला. हे प्रकरण पीडितेच्या आई-वडिलांना कळताच त्यांनी माजी नगरसेविकेकडे मदत मागितली. माजी नगरसेविकेकडून आरोपीच्या कुटुंबाकडून प्रकरण मिटवण्यासाठी चार लाख रुपये घेतले. यानंतर तिने पूर्वेकडील गालानगर येथील आर. के. हॉस्पिटलमध्ये मुलीची प्रसूती करवली. पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही हा प्रकार पोलिसांना कळविण्यात आला नव्हता. पीडितेची प्रसूती झाल्यानंतर तिचे बाळ तिच्या आई-वडिलांनी माजी नगरसेविकेच्या मदतीने विकले, असा आरोप पीडितेने केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सोअंतर्गत १६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पीडितेवर बलात्कार करणारे दोन तरुण, पीडित मुलीचे आई-वडील, एक माजी नगरसेविका, आर. के. हॉस्पिटलमधील दोन डॉक्टर आणि नवजात मुलीची विक्री करणारी महिला अशा १६ जणांचा समावेश आहे.
पीडितेच्या तक्रारीवरून वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक केले असून तपास सुरु आहे.
- बाळासाहेब पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आचोळे पोलिस ठाणे
दुसऱ्या बाळाचा जन्म
या प्रकरणानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी घर बदलले. बदललेल्या ठिकाणी अन्य एका तरुणाने पीडितेशी जवळीक साधत शारीरिक संबंध ठेवले, त्यानेही लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याने ती गर्भवती राहिली आणि दुसऱ्यांदा बाळाला जन्म दिला.