निचोळे गावातील पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढले; जल प्रदूषणामुळे झाल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:29 AM2019-07-05T00:29:52+5:302019-07-05T00:30:05+5:30
श्री कृष्णा डेरी फार्मच्या प्रदूषित पाण्यामुळे गावातील पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढले
वाडा : या तालुक्यातील निचोळे गावात असलेल्या श्री कृष्णा डेरी फार्मच्या प्रदूषित पाण्यामुळे गावातील पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढले असून ते पिण्यायोग्य नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच तहसीलदार यांना पाठविलेल्या निवेदनात केला असून कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे. मात्र कंपनी व्यवस्थापनाने या आरोपांचे खंडन केले आहे.
या कंपनीत दुग्धजन्य पदार्थ पनीर, चीज व योगर्ट याचे उत्पादन केले जाते. पाच वर्षापासून ही कंपनी येथे कार्यरत आहे. कंपनीत पनीर बनविताना केमिकल वापरले जाते. हे केमिकल मिश्रीत पाणी कंपनीच्या एका बाजूला तलाव काढून त्यात सोडले जाते. हे पाणी जमिनीत मुरते. त्यामुळे जल प्रदूषण होत असून गावात सार्वजनिक तसेच खाजगी विहीर आणि कूपनलिकेतील पाणी त्यामुळे दूषित झाले आहे. त्यात क्षारांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे. हे पाणी अंगावर घेतल्यास खाज येते ते प्यायल्यास गंभीर स्वरूपाचे आजार होण्याची भीती नागरिकांनी निवेदनात व्यक्त केली आहे.
कंपनीजवळ हाकेच्या अंतरावर जिल्हा परिषदेची शाळा आहे. या कंपनीत वीज गेल्यास जनरेटर लावला जातो. त्यामुळे वायू प्रदूषण होत असून ते विद्यार्थांच्या आरोग्यास धोका उत्पन्न करणारे असल्याचे निवेदनात नमूद केले. एकंदरीत कंपनीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ही कंपनी बंद करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनात केली आहे.
कंपनीत गावातील सुमारे ५० ते ६० कामगार काम करीत आहेत. जर पाण्यामुळे प्रदूषण झाले असते तर या कामगारांनाही त्रास झाला असता. मात्र गावातील कामगारांना कुठलाही त्रास होत नाही. गावातील राजकीय वाद कंपनीमध्ये आणला जात आहे. तसेच कंपनीमध्ये एटीपी प्लॅन्ट असून कारखान्यातील पाण्यावर प्रक्रि या करून ते पाणी कंपनीतील झाडांना दिले जाते. गेल्या एप्रिल मे महिन्यात या पाण्यावर भेंडी व वांग्याचं भरघोस उत्पन्न काढण्यात आले.
- सुरेश पष्टे, व्यवस्थापक, श्री कृष्णा डेरी फार्म