जुन्या गणवेशातच झेंड्याला सलामी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 01:40 AM2017-08-16T01:40:33+5:302017-08-16T01:40:33+5:30
जुना गणवेश परिधान करूनच ७१ व्या स्वातंत्र्य दिनी झेंड्याला सलामी देण्याची वेळ जिल्ह्यातील १,७३,१२० विद्यार्थ्यांवर ओढवली आहे
अनिरुद्ध पाटील ।
बोर्डी : शासनाकडून गणवेशाकरिता दिला जाणारा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा न झाल्याने जुना गणवेश परिधान करूनच ७१ व्या स्वातंत्र्य दिनी झेंड्याला सलामी देण्याची वेळ जिल्ह्यातील १,७३,१२० विद्यार्थ्यांवर ओढवली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी हिरमुसले असून पालकांमध्ये कमालीची नाराजी आहे.
७१ व्या स्वातंत्र्यदिनी पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा हा आनंद शासनाने हिरावून घेतला आहे. या शैक्षणकि वर्षापासून विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात दोन गणवेशाचे चारशे रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या करिता संयुक्त बँक खाते काढण्याचे विद्यार्थी आणि पालकांना सांगण्यात आले होते. मात्र, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत गणवेशाचे पैसे खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नवीन गणवेश मिळवा म्हणून हट्ट धरला असून पाल्याची मागणी पूर्ण कशी करावी हा प्रश्न पालकांना सतावतो आहे.
पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये पहिली ते ८ वी इयत्तेत शिकणाºया विद्यार्थिंनींची एकूण संख्या ९५,०९१ आहे. तर २०२९ अनुसूचीत जातीचे विद्यार्थी, ७४०१९ अनुसूचीत जमातीचे विद्यार्थी, १९८१ दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थी असे १,७३,१२० गणवेशासाठी लाभार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांचे चारशे रु पये या प्रमाणे ६,९२,४८,००० रुपये मिळणे अपेक्षित होते. गणवेशाची रक्कम मिळणार असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले होते.