लॉकडाऊनमध्ये समाजमंदिराचे झाले ज्ञानमंदिर; ‘विद्यार्थीच माझा गुरू’ची राबवली संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 12:55 AM2020-08-25T00:55:25+5:302020-08-25T00:55:48+5:30
दुर्गम भागातील कांद्रेभुरे जि.प. शाळेचा उपक्रम
सफाळे : लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने पालघर तालुक्यातील दुर्गम भागात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून समाज मंदिरात विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. जिल्हा परिषद कांद्रेभुरे येथील शिक्षिका जागृती चौधरी यांच्या ‘विद्यार्थीच माझा गुरू’ या शैक्षणिक संकल्पनेतून यश मिळत आहे.
सफाळे पश्चिमेला अतिदुर्गम भागातील कांद्रेभुरे हे गाव डोंगराच्या पायथ्याशी आहे. या विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने धडे घेता येत नसल्याने ते वंचित होते. प्राथमिक शिक्षणाचा पाया ढासळू नये म्हणून हा उपक्र म केला जात असल्याचे जागृती चौधरी यांनी सांगितले. कांद्रेभुरेचे सरपंच जगदीश पाटील यांनी प्रथम आपल्या मुलाला जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका जागृती चौधरी यांच्या मार्गदर्शनासाठी पाठवले. त्यानंतर इतर पालकांनीही इंग्रजी माध्यमातून काढून जिल्हा परिषद शाळेत पाठवायला सुरु वात केली.
आतापर्यंत या शाळेत गावातील इंग्रजी माध्यमातील ८० टक्के मुले दाखल झाली आहेत. त्यांचे मराठी वाचन, लेखन सराव स्वयंसेवक पालक यांच्या मदतीने घेतला जात आहे. या मुलांचे वाचन, लेखन अंतिम टप्प्यात पोहोचलेले आहे. उपक्र मावर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू पाटील यांची मोलाची साथ लाभत आहे. त्यांच्या परवानगीने व आग्रहावरून हा उपक्र म राबवण्यात आला आहे. अशा रीतीने सर्व स्वयंसेवक, पालक, पंचायत समिती सदस्य, सरपंच पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य आणि ग्रामस्थांच्या मदतीने जिल्हा परिषद कांद्रेभुरे येथे सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून शिक्षणाचा प्रवाह सुरू केला आहे.
कोरोनाकाळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता ‘विद्यार्थी माझा गुरू’ ही संकल्पना मला सुचली. मी गावाचे तीन भाग केले. ठरल्याप्रमाणे शाळेतील मुले सर्व नियमांचे पालन करून येत असतात. तसेच स्वयंसेवक चांगला सराव करून घेऊन एक ते दीड तासात शिकवत असतात. हा उपक्र म इयत्ता पहिली, दुसरी आणि तिसरीसाठी आहे. कारण, या विद्यार्थ्यांचा पाया कमजोर राहिला तर शाळा सुरू झाल्यास त्यांचे नुकसान होईल. त्यामुळे शाळा चालू झाल्यावर शाळेतील विद्यार्थ्यांना काही अडचण येणार नाही.
- जागृती चौधरी, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद शाळा, कांद्रेभुरे
जिल्हा परिषद शाळा, कांद्रेभुरे या शाळेत मुख्याध्यापिका जागृती चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम माझ्या मुलाकडून सुरु वात केली. इतर पालकांनीही इंग्रजी माध्यमातून जिल्हा परिषद शाळेत पाठवायला सुरु वात केली. या शाळेची दखल घेऊन एक वर्षापासून रिक्त असलेली पदे भरून आमच्या शाळेला न्याय द्यावा. -जगदीश पाटील, सरपंच, कांद्रेभुरे