संजय गांधी योजनेचा फज्जा ?
By admin | Published: October 7, 2015 11:53 PM2015-10-07T23:53:44+5:302015-10-07T23:53:44+5:30
जव्हार तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील पात्र १२०४ आदिवासी लाभार्थ्यांना जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर अशा ४ महिन्यांचे अनुदान न मिळाल्यामुळे त्यांच्यावर
जव्हार : जव्हार तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील पात्र १२०४ आदिवासी लाभार्थ्यांना जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर अशा ४ महिन्यांचे अनुदान न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने निराधारांना आर्थिक आधार देवून उतार वयात कोणावरही अवलंबून राहता येवू नये, त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे म्हणून ही योजना अमलात आणली. परंतु लालफितीच्या कारभारामुळे जव्हार तालुक्यात या योजनेचा पुरता फज्जा उडाला आहे.
शासकीय नियमानुसार महसूल कार्यालयाने दरमहा पात्र लाभार्थ्यांची यादी आणि अनुदानाची एकूण रक्कम याची महिन्याभरापूर्वी मंजुरी घेवून महिन्याच्या १ तारखेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रकम जमा करायची असते. या योजनेतील लाभार्थ्यांला दरमहा ६०० रूपये अनुदान मिळते. जव्हार सारख्या अतिदुर्गम तालुक्यात आजही, अनेक भागात रस्ते पोहचलेच नाहीत त्यामुळे वयोवृद्ध, निराधार महिला आणि पुरूष पायपीट करून तर अनेकजण पदरमोड करून ६०० रूपयांच्या मानधनासाठी जव्हारला येतात. त्यांना जर महिन्याला ५ ते ६ वेळा यावे लागले तर त्यांचा येण्या जाण्याचा खर्च हा मानधनापेक्षा जात होतो. शासनाने प्रत्येक योजनेसाठी तालुका स्तरावर एक स्वतंत्र कमिटी स्थापन केली आहे. तहसीलदार सचिव असलेल्या या कमिटीवर अशासकीय सदस्य देखील असतात, दरमहा तहसीलदार प्रत्येक तिची मिटिंग घेवून नवीन लाभार्थी निवड, काही आक्षेप आहेत का?, योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांला वेळेवर मिळातो की नाही याबाबत आढावा घेत असतात. परंतु पालघर जिल्हा निर्मितीनंतर सर्व कमीटया बरखास्त झाल्यामुळे जव्हार तालुक्यात अनेक योजनांचा बोजवारा उडाला असल्यामुळे नवीन कमीट्या लवकरात लवकर नियुक्त कराव्यात अशी मागणी संजय गांधी योजना कमेटीचे माजी सदस्य श्याम राऊत यांनी केली आहे. (वार्ताहर)