वाढवणच्या बंदरासाठी डोंगरांवर येणार संक्रांत, भरावासाठी दगड, मातीची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 08:42 AM2020-12-11T08:42:20+5:302020-12-11T08:42:46+5:30
वाढवण बंदर उभारणीसाठी लागणारे दगड, मुरूम, मातीच्या उपलब्धतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने महसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सरकारी डोंगराचे शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.
- हितेन नाईक
पालघर : वाढवण बंदर उभारणीसाठी लागणारे दगड, मुरूम, मातीच्या उपलब्धतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने महसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सरकारी डोंगराचे शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. ७ कोटी ब्रास दगड आणि १० कोटी ब्रास माती-मुरुमाचा प्रचंड भराव घातला जाणार असून यासाठी अनेक डोंगर नष्ट केले जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वाढवण बंदर उभारणीसाठी पर्यावरण, वन आणि हवामान खात्यांची मंजुरी केंद्र सरकारने मिळवली असून वाढवण बंदर झाल्यास परिसरात त्याच्या होणाऱ्या प्रभावाचे मूल्यांकन, अभ्यास करण्यासाठी मान्यता दिली आहे. दुसरीकडे अनेक तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी जल ऊर्जा संशोधन केंद्र, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी आदी अनेक संस्थांना नियुक्त करण्यात आले आहे. परंतु कुठल्याही संस्थांना वाढवणच्या भूमीवर स्थानिकांनी एकजुटीचे दर्शन घडवीत पाय ठेवू दिलेला नाही. लोकशाही मार्गाने स्थानिकांच्या सुरू असलेल्या लढ्यामुळे जेएनपीटी आणि जिल्हा प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे. परंतु केंद्राच्या दबावामुळे सध्या वरवर शांत दिसत असलेल्या जिल्हा प्रशासनाने वाढवण बंदरात भरावासाठी डोंगर शोधण्याचे काम तहसीलदार पालघर, मंडळ अधिकारी बोईसर, मनोर आणि वन परिक्षेत्र अधिकारी बोईसर, मनोर यांच्यावर ४ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत सोपवण्यात आले आहे. समुद्रात ५ हजार एकर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या महाकाय जेट्टीसाठी सुमारे ७ कोटी ब्रास दगड आणि १० कोटी ब्रास माती-मुरूम लागणार असल्याची महिती पुढे येत आहे.
जिल्ह्यात उपवन संरक्षक डहाणू आणि जव्हार विभागासह वनविकास महामंडळ या विभागाकडे वन, जंगले, डोंगर आदींचा ताबा आहे. पालघर महसूल विभागांतर्गत बोईसर आणि मनोर मंडळ अधिकारी क्षेत्रात एकही डोंगर मालकीचा नसून डहाणू उपवन संरक्षक अंतर्गत असलेल्या तलासरी, डहाणू, पालघर आणि वसई क्षेत्रात अनेक डोंगर आहेत. वन विभागाकडून डोंगराचा ताबा मिळवून त्यातून दगड, मुरूम मिळविण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार करणार असून त्याला विरोध झाल्यास परदेशातून महाकाय जहाजाद्वारे हे गौण खनिज आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.