तळमजल्यांवरचे संसार थेट गच्चीवर; दोन दिवसांपासून वरतीच कुटुंब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 09:50 AM2023-07-22T09:50:12+5:302023-07-22T09:51:12+5:30

वसई - विरारमध्ये नालेसफाईचे पितळ उघड, पावसाच्या पाण्याचा निचरा होईना

Sansara on the ground floors directly on the terrace; Family upstairs for two days nalasopara | तळमजल्यांवरचे संसार थेट गच्चीवर; दोन दिवसांपासून वरतीच कुटुंब

तळमजल्यांवरचे संसार थेट गच्चीवर; दोन दिवसांपासून वरतीच कुटुंब

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
नालासोपारा : मंगळवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण वसई तालुक्याला नदी, नाल्याचे स्वरूप आले आहे. नालासोपारा, वसई आणि विरारमधील अनेक इमारतींमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने तळमजल्यावरील घरात कंबरेएवढे पाणी झाले. त्यामुळे रहिवाशांनी आपल्या बिऱ्हाडासह इमारतीच्या गच्चीवर संसार थाटले आहेत. गेले दोन - तीन दिवस ते गच्चीवरच राहात आहेत.

वसई - विरार पालिकेने मोठा गाजावाजा करून यंदा वसईत पाणी तुंबणार नाही, असे सांगितले होते. नाल्यांची योग्य साफसफाई, पाणी साचल्यावर सक्शन पंप, आपत्कालीन यंत्रणा नागरिकांच्या मदतीसाठी असणार असल्याचे पालिकेने सांगितले होते. पण, तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नालेसफाईचे पितळ उघडे पडले आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचल्याने जनजीवन ठप्प होऊन दुकानात, घरांत पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आपत्कालीन यंत्रणा, साफसफाई कर्मचारी कुठे आहेत? असा सवाल सामान्य नागरिक करत आहेत. 

महामार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा 
n वसई-विरारमध्ये पावसाची संततधार सलग तिसऱ्या दिवशी सुरूच आहे. शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक व जनजीवन दोन्ही ठप्प झाले आहे.
n वसईतील गास - सनसिटी रोड, देवतलाव, ससूपाडा, मालजीपाडा येथील महामार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. वसई पूर्वेतील एव्हरशाईन, भोईदापाडा, नवजीवन परिसरातही पाणी साचले होते. नवघर बस आगारातही पावसाचे पाणी साचले होते. 
n नालासोपारा येथील स्टेशन रोड, आचोळे, तुळींज, अलकापुरी, नगीनदास पाडा, विरारमधील विवा कॉलेज परिसर, चंदनसार, एम. बी. इस्टेट, बोळींज परिसरात पाणी साचले होते. सलग तीन दिवस कोसळत असलेल्या पावसाने वसईकरांची त्रेधातिरपीट उडाली आहे.

 

Web Title: Sansara on the ground floors directly on the terrace; Family upstairs for two days nalasopara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.