सोपारा बौध्दस्तुप कात टाकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:12 PM2018-12-14T23:12:47+5:302018-12-14T23:13:13+5:30
सोपारा येथील बौद्ध स्तूपाची दुरावस्था झालेली पहायला मिळत आहे.
वसई : सोपारा येथील बौद्ध स्तूपाची दुरावस्था झालेली पहायला मिळत आहे. मात्र, तो पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येत असल्यामुळे, तसेच काही अंशी निर्बंध असल्यामुळे महानगरपालिकेला या ठिकाणी सुविधा देता येत नाही. अशा अनेक विषयांवर केंद्रीय पुरातत्व विभागाकडून मान्यता मिळविण्यासाठी महापौर रूपेश जाधव व माजी महापौर नारायण मानकर यांनी गुरूवारी दिल्लीत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या महासंचालक उषा शर्मा यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनीही या प्रकरणी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे येत्या काळात सोपारा बौद्ध स्तूप पुन्हा नव्याने कात टाकणार असल्याचे संकेत महापौरांनी दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समिती ही सोपारा बौद्धस्तुप संवर्धनाबाबत अतिशय उत्साहाने कार्य करीत आहे. महापालिकेला या बौद्ध स्तूपाच्या संवर्धनासाठी हातभार लावायचा आहे. ती ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय या परिसरातील पानही हालवता येत नाही. या स्तूपाची दुरावस्था लोकमतने १७ नोव्हेंबरच्या हॅलोमध्ये मांडून या प्रकरणी सर्वप्रथम वाचा फोडली होती. तो विषय चर्चेमध्ये आला होता. या प्रकरणी महापौर रूपेश जाधव यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालक उषा शर्मा यांची भेट घेतली. सोपारा पश्चिमेकडील बौद्ध स्तूप सद्या दुर्लक्षीत अवस्थेत आहे. फार वर्षापुर्वी चंदनी दरवाजे असलेल्या या बद्धविहारची स्थापना भगवान गौतम बुदधांनी केली होती अशी मान्यता आहे. स्तुपाच्या प्रवेशद्वाराची पडझड झाली असून अनेक सोयीसूविधांचा येथे वानवा आहे. त्यामूळे पर्यटकांची मोठी गैरसोय होते.
हजारो वर्षांचा इतिहास झाला मातीमोल
हा बुद्ध स्तुप मर्देस आणि नालासोपारा यांच्या सिमेवरील सोपारा गावाजवळ आहे. इथेच अनेकांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. भगवान बुद्धांनी ५०० महिलांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली असल्याचा उल्लेखही आढळतो. हा स्तुप सांची स्तुपासारखा होता. काळाच्या ओघात तो नष्ट झाला. मात्र त्याचे ऐतिहासिक महत्त्व कमी झालेले नाही. त्यामुळे या बौद्य स्तुपाला भेट देण्यासाठी जगभरातून हजारो लोक येत असतात. मात्र याच्या संवर्धनासाठी कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे हा ऐतिहासिक ठेवा आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
परिसरात प्राथमिक सोयीसुविधाही नसल्याने येणाऱ्यांना बौद्ध भिक्खू आपल्यासोबत तंबू घेऊन येतात. स्तुपाच्या मार्गावर महापालिकेने भव्य प्रवेशद्वार बनवले होते. या प्रवेशद्वारावरील मूर्तीही निखळून पडू लागल्या आहेत. बौद्ध स्तुपाच्या परिसराचा विकास होणे गरजेचे आहे.यात स्मारक, अभ्यास केंद्र, विश्रांतिगृह, हॉटेल, उद्याने तसेच बौद्ध संस्कृतीचे वास्तुसंग्रहालय बनविल्यास जगभरातून पर्यटक सोपा-यात येतील.सद्या या परिसराला परिसराला अतिक्र मणाने वेढा घातला आहे.
बौद्ध स्तुपाच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून मान्यता मिळाल्यास लवकरच या परिसरात महानगरपालिकेकडून सोयी सुविधा देण्यात येतील. सुरक्षीतेसाठी कायम स्वरूपी सुरक्षारक्षक तैनात करण्यात येईल. - रूपेश जाधव,
महापौर वसई विरार महानगरपालिका
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या महासंचालक उषा शर्मा यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद आहे. जानेवारी २०१९ ला या बौद्धस्तूप परिसरात होणाºया धम्मपरिषदेसाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. - नारायण मानकर, माजी महापौर