सत्पाळ्यात शेतकऱ्याने केली सिंगापुरी फणसाची लागवड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 12:21 AM2019-03-06T00:21:58+5:302019-03-06T00:22:03+5:30
ब-याच वर्षापूर्वी सिंगापूरी नारळाची भूरळ वसईतील शेतक-यांना पडली होती. ती नारळाची झाडे आता आपल्या मातीशी एकरूपही झाली आहेत.
वसई : ब-याच वर्षापूर्वी सिंगापूरी नारळाची भूरळ वसईतील शेतक-यांना पडली होती. ती नारळाची झाडे आता आपल्या मातीशी एकरूपही झाली आहेत. वसईत फणसाची शेती होत नसली तरी एका प्रयोगशील शेतकऱ्याने चक्क सिंगापूरी फणसाची शेती करण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. सिंगापूरी नारळासोबत आता फणसही सध्या वसईत चर्चेचा विषय बनला आहे. परदेशी फणसाच्या बियांपासून वाढवलेल्या झाडांना फणस लागलेले सध्या वसईत पहायला मिळत आहेत. आणि तो कुतूहलाचा विषय ठरला आहे.
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसईतील ताजी भाजी, फुले, केळी, पपई मुंबईकरांसाठी पहिली पसंत असते. या वसईत भातशेतीही मोठ्या प्रमाणात केली जाते. सोबत आॅर्चिड, हेलिकेनिया फुलांची यशस्वी लागवडही काही शेतकरी करीत आहेत. मोगरा, जाई, जुई आणि पिवळा चाफा या फुलांची शेती मोठ्या प्रमाणात होत असतांना, फळझाडांवर वसईतील शेतकरी विविध प्रयोग करून उत्पादन घेत असतात. वसईच्या सत्पाळे येथील असेच एक प्रयोगशील शेतकरी सुभाष भट्टे यांनी वसईत सिंगापूरी फणसांची झाडे लावून, फणसाचे उत्पन्नही घ्यायला सुरूवात केली आहे. या फणसाचे गरे केशरी रंगाचे आहेत. सामान्य फणसासारखे हे फणस दिसते.
>मित्रांनी परदेशवारीनंतर भट्टेंना दिल्या होत्या बिया
वसई म्हणजे केळीच्या बागा हे समिकरण असताना, वसईत सिंगापूरी फणसाची शेती झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. शेतकरी सुभाष भट्टे यांचे काही मित्र सिंगापूरला गेले होते.विमान प्रवासात फणस खाल्यानंतर त्याच्या बिया भट्टे यांच्या मित्राने कुतूहल म्हणून जपून ठेवल्या. परत आल्यावर त्यांनी त्या बिया रूजवून त्यांची रोपटी भट्टे यांना दिली. भट्टे यांनी या सिंगापूरी फणसाची रोपटी वसईच्या मातीत रूजवून बघण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या घराशेजारील वाडीत याची लागवड केली. ३ वर्षानंतर त्यांच्या या प्रयोगाला यश आले आणि वसईत सिंगापूरी फणस दिसू लागले. या फणसाच्या झाडांना आता १० वर्षे झाली असून वर्षातून २ वेळा या झाडांना फणस येत असल्याचे त्यांनी सांगीतले. आठ ते दहा सिंगापूरी फणसाची झाडे सध्या त्यांच्या वाडीत आहेत. त्यांना २०१५ साली महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषी पुरस्कारही मिळाला आहे. आता या फणसांची लागवड वसईत मोठ्या प्रमाणात होणार आहे.
>सिंगापूर, थायलंड, मलेशीया येथील वातावरण हे आपल्या भागातील वातावरणाशी मिळते जुळते असल्यामूळे सिंगापूरी नारळ किंवा फणस आपल्या मातीशी एकरूप होतात. सध्या मी सोनचाफा व जास्वंद याचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतो.
- सुभाष भट्टे, प्रगतिशील शेतकरी (वसंतराव नाईक कृषि पुरस्कार विजेते)