आयुष्यातील संकटांना वेलकम म्हणा - सिंधुताई सपकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 02:58 AM2018-03-25T02:58:30+5:302018-03-25T02:58:30+5:30
सगळ्या महिलांनी हसत-हसत आयुष्याला सामोरे गेले पाहिजे. आपल्या समोर आलेल्या संकटाला वेलकम म्हटले पाहिजे, देशाचे दु:ख आपले दु:ख समजून ते दूर केले पाहिजे, असे उदगार अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी चहाडे येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व वेदांता हॉस्पिटल यांच्यामार्फत आयोजित महिला मेळावा व महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी काढले.
नंडोरे : सगळ्या महिलांनी हसत-हसत आयुष्याला सामोरे गेले पाहिजे. आपल्या समोर आलेल्या संकटाला वेलकम म्हटले पाहिजे, देशाचे दु:ख आपले दु:ख समजून ते दूर केले पाहिजे, असे उदगार अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी चहाडे येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व वेदांता हॉस्पिटल यांच्यामार्फत आयोजित महिला मेळावा व महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी काढले.
महिला सक्षमीकरणाबद्दल बोलताना त्यांनी मी ही माझ्या जीवनात अनेक ठोकरा खाल्यात मात्र त्यावेळी मी त्या परिस्थितीला सामोरे गेले व दुसऱ्यांचे दु:ख समजून घेतले ज्यांना समाजाने स्वीकारले नाही अशानां मी स्वीकारले म्हणूनच आज मी अनाथांची माय म्हणून संबोधिली जाते. महिलांनी या गोष्टीचे आचरण करून निर्भीड बनावे असा सल्ला देऊन दु:ख सोसण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी महिलेचा जन्म आहे हे त्यांनी सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, रमाई, बहिणाबाई आदी महान स्त्रियांची उदाहरणे देऊन स्पष्ट केले. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटनेचे कार्य येथे मोठे असून सामाजिक बांधिलकी जपली जाते. शिक्षण असो, वैद्यकीय असो वा आर्थिक मदत असो त्या भावनेतून पुढे येऊन आपल्या कष्टाचा वाटा समाजाप्रती अर्पण करीत असल्याबद्दल त्यांनी निलेश सांबरे यांचे कौतुक करावे तितके कमी असल्याचे यावेळी सांगितले.
सकाळच्या सत्रातील हळदी कुंकू कार्यक्रमात प्लॅस्टिक बंदीचे महत्व पटविण्यासाठी जिजाऊ संस्थेतर्फे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. रांगोळी स्पर्धा ही घेण्यात आल्यात. यशदा पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते डॉ.सुमंत पांडे यांचे महिला सबलीकरणावरील मार्गदर्शनही यावेळी यानिमित्ताने लाभले. महाआरोग्य शिबिरात सुमारे १ हजार महिलांनी येथे उपलब्ध करून दिलेल्या विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला व या आरोग्य सेवा पुढेही येथे देण्यात येणार असल्याची ग्वाही निलेश सांबरे यांनी दिली. नरेश आकरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेचे कार्य व माहिती विशद केली. त्यानंतर भावनादेवी सांबरे,वेदांताचे सनद कुमार प्रभू, सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आदींना मार्इंच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अपार कष्ट करून यशस्वितेची शिखरे गाठलेल्या महिला उद्योजक रोशनी सुलाखे, आजपर्यंत विविध प्राण्यांना जीवदान देणार्या डॉ.सायली भानुशाली कसलीही तमा न बाळगता हातात स्टेरिंग घेणारी रिक्षाचालक योगिता मुखर्जी, राष्ट्रीय नेमबाज पूजा पाटील, महिला कबड्डीच्या मैदानावर राज्य गाजवणार्या तन्वी सुर्वे, श्रेया घरत, क्षितिजा पाटील, तनुजा नाईक, प्रतिभा क्षीरसागर, पूर्वा भोईर यांचा सत्कार करण्यात आला.