वाडा पंचायत समितीत भात बियाणांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:28 AM2018-06-07T01:28:54+5:302018-06-07T01:28:54+5:30
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतांना वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे भातबियाणांचा तुटवडा आहे. शेकडो शेतकरी कृषी विभागाच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत.
वाडा : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतांना वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे भातबियाणांचा तुटवडा आहे. शेकडो शेतकरी कृषी विभागाच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत. मात्र बियाणांचा तुटवडा असल्याने शेतकरी नाराज असून या गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील वाडा कोलम हा भाताचा वाण देशभर प्रसिद्ध आहे. वाडा कोलम या भाताच्या वाणाला मुंबईच्या बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. तालुक्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड केली जाते. झिनी, गुजरात ४ , गुजरात ११, रूपाली, दप्तरी, कर्जत ५, कर्जत ७, सुवर्णा, पूनम आदी भाताच्या वाणाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. भात हे येथील मुख्य पिक आहे. असे असताना वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे आताच्या घडीला कोणतेच बियाणे शिल्लक नसल्याने तालुक्यातील शेकडो शेतकरी या विभागाकडे हेलपाटे मारत आहेत. हजारो हेक्टर भातशेती येथे केली जात असतांना बियाणांचा येथे पत्ताच नसल्याने शेतकरी कृषी प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत आहेत. कृषी विभागाकडे बियाणे हे पन्नास टक्के सवलतीच्या दरात मिळते.
शेतकऱ्याची होते लूट
शेतकरी पंचायत समितीमार्फत दिल्या जाणाºया बियाणांना पसंती देतात. मात्र यावर्षी पंचायत समितीच्या कृषी विभागाने शासनाकडे काही टन बियाणांची मागणी करूनही फक्त १५० क्विंटल कर्जत हेच बियाणे येऊन ते संपलेही त्यामुळे बियाणांसाठी शेतकरी कृषी विभागाकडे हेलपाटे मारत आहेत. वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाची उदासीनता यावरून दिसून येते. त्यामुळे शेतकºयांना व्यापाºयांकडून महागडे बियाणे खरेदी करावे लागते आहे.
१०९ वाणाचे १५ क्विंटल भात बियाणे आले होते.त्याचे वाटप शेतकºयांना करून झाले आहे. आता बियाणे शिल्लक नाही. - आर. आर. जाधव,
कृषी अधिकारी, पंचायत समिती, वाडा
पावसाळ्याला आता काही दिवस उरले असताना पंचायत समिती सांगते आहे, की कृषी विभागाकडे बियाणांचा तुटवडा आहे. यावरून ती किती उदासीन आहे, हे दिसून येते.प्रशासन व कृषी सेवा केंद्रे यांचे साटेलोटे असल्याने कृषी विभाग जास्त बियाणे मागवत नाही.याची चौकशी होणे गरजेचे आहे. -प्रफुल्ल पाटील, युवा शेतकरी नेते