विरारमध्ये शालेय पोषण आहाराचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 10:44 PM2020-02-10T22:44:54+5:302020-02-10T22:45:03+5:30
पोलिसांकडून गुन्हा दाखल : ‘प्रहार’ संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चित्रीकरण व पाठलाग
नालासोपारा : विरार पूर्वेकडील सरकारमान्य शाळांतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी देण्यात आलेला शालेय पोषण आहाराचा तांदूळ रविवारी दुपारी मनवेलपाडा परिसरात विकताना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टेम्पोचा पाठलाग करून विविध दुकानांमध्ये विकत असताना रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संपूर्ण चोरी प्रकरणाचे कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये चित्रण करून विरार पोलिसांना पाचारण करत पुरावे दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरार पूर्वेकडील शास्त्री विद्यालयाला सरकारकडून विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी शालेय पोषण आहाराचा तांदूळ येतो. तो तांदूळ गोडाऊनमध्ये ठेवण्यात येतो. आरोपी धर्मेंद्र उपाध्याय व त्याच्या साथीदाराने गोडाऊनची चावी विश्वासाने सांभाळण्यासाठी दिलेली असताना शाळेच्या मुख्याध्यापिका सुधाराणी सतीश मिश्रा (५५) यांचा विश्वासघात करून ४५ हजारांचा ३०० किलो तांदूळ मनवेलपाडा परिसरात विकल्याची तक्रार विरार पोलीस ठाण्यात दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हा तांदूळ गेल्या अनेक वर्षांपासून विकत असल्याची माहिती प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना होती व यावर ते पाळत ठेवून होते. हा सर्व चोरीचा प्रकार त्यांना लोकांना निदर्शनास आणून द्यायचा होता. रविवारी गोडाऊनमधील तांदूळ एका टेम्पोने मनवेलपाडा परिसरातील दुकानांमध्ये विकताना पकडला.
शालेय पोषण आहाराचे धान्य शाळा ब्लॅकने विकत आहेत. आमच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून टेम्पो आणि धान्य विकलेली ठिकाणे मोबाईलमध्ये शूटिंग करून विरार पोलिसांना पकडून दिले आहे.
-हितेश जाधव, जिल्हाध्यक्ष, प्रहार संघटना
याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी तक्रार दिल्यावर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शाळेच्या केअरटेकरने हा शालेय पोषण आहार विकला आहे. पाच आरोपींना अटक केली आहे.
- सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार
याबाबत कोर्टात केस सुरू आहे. धान्य चोरी झाले नाही तर ते शिफ्टिंग करत होते. मी काल दुपारी शाळेत नव्हते. याबाबत मी सेक्रेटरी यांच्याशी बोलून तुम्हाला कळते.
- सुधाराणी मिश्रा, मुख्याध्यापिका, शास्त्री विद्यालय