पालघर जिल्ह्यात 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:03 AM2020-11-24T00:03:24+5:302020-11-24T00:03:53+5:30
ग्रामीण भागात परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे निर्देश : ३० नोव्हेंबरपर्यंत पालकांची संमती घेण्याच्या सूचना
हितेंन नाईक/अनिरुद्ध पाटील
पालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील नववी ते बारावी इयत्तांच्या शाळा उघडण्याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. त्यानुसार जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत आणि पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्येच्या ग्रामपंचायती असलेल्या गावांमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील शाळांनी ३० नोव्हेंबरपर्यंत पालकांचे संमती पत्रक घेऊन स्थानिक परिस्थितीनुसार शाळा उघडण्याचे निर्देश दिले आहेत.
पालघरच्या शेजारी असलेल्या मुंबई, ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यांतील शाळा २३ नोव्हेंबर रोजी उघडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शाळा उघडण्याबाबत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांप्रमाणेच नागरिकांमध्येही साशंकता होती. रविवारी जिल्हा प्रशासनाने शाळा उघडण्याबाबत पुढील आदेशाची वाट पाहण्याचे निर्देश शैक्षणिक संस्थांना दिले होते. त्यामुळे विद्यार्थी-पालकांच्या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शाळा उघडण्याबाबत तूर्तास थांबण्याचे कळविण्यात आले. त्यामुळे सोमवारी शाळांची दारे विद्यार्थ्यांकरिता उघडली नाहीत, मात्र शाळा कधी उघडणार याबाबत उत्सुकता वाढलेली दिसली.
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार आढावा बैठक घेऊन शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या १० नोव्हेंबर रोजीच्या परिपत्रकानुसार चर्चा करण्यात आली. त्याकरिता पालघरचे खासदार राजेंद्र गावित, सहा मतदारसंघातील आमदार आणि वसई-विरार महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. भौगोलिक परिसर आणि सध्याची कोविडची स्थिती याअनुषंगाने वसई-विरार महापालिका क्षेत्र, पालघर, डहाणू, जव्हार नगरपालिका क्षेत्र, तलासरी, वाडा, मोखाडा, विक्रमगड या नगरपंचायती क्षेत्र आणि बोईसर, तारापूर या औद्योगिक परिसराच्या क्षेत्रातील ग्रामपंचायत क्षेत्रात ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये तूर्तास शाळा बंदच राहणार आहेत.
चाचण्या थांबवल्या
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत शाळेला संमतीपत्रकाद्वारे पाल्याला शाळेत पाठविण्याची सहमती कळवायची आहे. दरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने तालुकस्तरावर शिक्षकांच्या कोविड चाचणीस प्रारंभ केला आहे. अशा चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून सोमवारच्या बैठकीत नव्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.
...तर अँटिजेन चाचणी
ज्या भागात शाळा सुरू होणार असतील, तेथील शिक्षकांनी नजीकच्या आरोग्य उपकेंद्रात व सीसीसी सेंटरवर जाऊन आरटीपीसीआर चाचणी करायची आहे. ज्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी यापूर्वी चाचणी केली आहे, त्यांना तूर्तास चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. मात्र ज्या शिक्षकांमध्ये लक्षणे आढळली असल्यास त्यांना अँटिजेन चाचणी करावी लागणार असून अहवाल निगेटिव्ह येणे आवश्यक आहे.