डहाणू समुद्रकिनारी सिगल निरीक्षणाची पर्वणी, पर्यटनाचे नवे दालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:27 AM2020-03-16T00:27:11+5:302020-03-16T00:27:33+5:30
डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावरून प्रवास करताना हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी मुद्दामहून रस्त्यालगत वाहने थांबवली जातात. त्यांची चाललेली हितगुज ऐकण्यासाठी पक्षीवेडे तासन्तास घालवतात.
- अनिरु द्ध पाटील
डहाणू/बोर्डी : पावसाळा लांबल्याने हिवाळ्याच्या प्रारंभी दाखल होणाऱ्या सिगल पक्ष्यांचे थवे मार्च महिन्यात दृष्टीस पडत आहेत. त्याची दखल स्थानिक आणि पर्यटक घेत आहेत. पक्षी निरीक्षणाद्वारे पर्यटनाच्या या नव्या दालनाच्या विकासाची आवश्यकता व्यक्त होत आहे.
तालुक्याला ३५ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून बोर्डी, घोलवड, चिखले, नरपड, पारनाका या स्थळांनी पर्यटकांप्रमाणेच विविध जातींच्या पक्षांनाही भुरळ घातली आहे. घोलवड, बोर्डी आणि नरपड-चिखले खाडी पुलानजीक दरवर्षी हिवाळ्याच्या प्रारंभी सिगल पक्ष्यांचे आगमन होते. मोठ्या संख्येने थव्यातून फिरत असल्याने त्यांचा वावर दखल घ्यायला लावणारा आहे. पावसाळा लांबल्याने या वेळी त्यांची संख्या कमी होती. मात्र मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही संख्या वाढू लागली आहे. त्यांच्या जवळ गेल्यावर ते लगेच उडत नसल्याने त्यांच्या निरीक्षणाची पर्वणी मिळते आहे.
डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावरून प्रवास करताना हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी मुद्दामहून रस्त्यालगत वाहने थांबवली जातात. त्यांची चाललेली हितगुज ऐकण्यासाठी पक्षीवेडे तासन्तास घालवतात. किनाºयावर थव्यांमधून दाटीवाटीने बसलेले, घिरट्या घालणारे आणि लाटांवर पोहणारे अशा सिगलांच्या क्रीडा कॅमेºयात टिपण्यास येणारेही अनेकजण आहेत. नरपड-चिखले खाडी पूल, घोलवड खाडी-नजीक कांदळवन तसेच महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील काही पाणथळ जागांवर जाऊन नेमाने पक्षी निरीक्षण करीत असल्याची माहिती काही पक्षी अभ्यासकांनी दिली. या वेळी लहान-मोठे विविध जातींचे स्थलांतरीत पक्षी विनासायास दृष्टीस पडतात. खंड्या, समुद्र सताने, घुबड या पक्षांच्या दुर्मिळ जाती या भागात दृष्टीस पडल्याचे ते म्हणाले. दरम्यान, येथे खाडी किनारा, रेतीचे पठार आणि कांदळवन असल्याने स्थलांतरित पक्षांच्या निरीक्षणाची संधी उपलब्ध आहे.
नियोजित विकासाची गरज
पर्यटन स्थळ असलेल्या या तालुक्याला हे नवे दालन खुणावत असून त्याच्या विकासाकरिता नियोजित पद्धतीने काम झाले पाहिजे.
पाणथळ जागांवर होणारी बांधकामे जैवविविधतेला धोका पोहोचवत असल्याने त्यांच्यावर कारवाईची गरज आहे.