हंगामापूर्वीच आंब्याला मोहर, बागायतदारांना आर्थिक फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 01:26 AM2020-11-22T01:26:28+5:302020-11-22T01:27:04+5:30
सीमा भागातील डहाणू आणि तलासरी या तालुक्यातील समुद्रकिना-यापासून १५ ते २० किमी अंतरावरील विविध गावांमध्ये, नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी काही आंबा कलमे मोहरतात.
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : गेल्या चार-पाच वर्षांपासून उत्तर कोकणात हंगामाआधी आंबा कलमे मोहरल्याचे दिसून आले आहे. शिवाय काही झाडांना लगडलेली फळे पक्व झाल्याचे निरीक्षण शेतकरी यांनी नोंदवले आहे. दरम्यान, या अवकाळी झाडांचा मोहर नियमित करण्याच्या दृष्टीने प्रयोग झाल्यास दक्षिण कोकणातील बागायतदारांप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील आंबा बागायतदार आर्थिक सधन होऊ शकतो.
सीमा भागातील डहाणू आणि तलासरी या तालुक्यातील समुद्रकिना-यापासून १५ ते २० किमी अंतरावरील विविध गावांमध्ये, नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी काही आंबा कलमे मोहरतात. अनेक शेतकरीही सोशल मीडियावर सक्रिय असल्याने मागील चार-पाच वर्षांपासून ही बाब सर्वांसमोर येत आहे. उत्तर कोकणात डिसेंबरअखेर ते जानेवारी या कालावधीत आंबा झाडे मोहरतात. एप्रिल अखेर ते मे महिन्यात फळे पक्व होतात. उशिरा फळे बाजारात येत असल्याने चांगला दर मिळत नाही. परिणामी, बागायतदारांचे आर्थिक नुकसान होते. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा लवकर बाजारात येऊन अधिक दर मिळून बागायतदारांना आर्थिक फायदा होतो. उत्तर कोकणातल्या अवकाळी मोहरणा-या आंबा झाडांवरचा मोहर नियमित करण्याच्या दृष्टीने प्रयोग होणे आवश्यक आहे. कृषी विभागातील तज्ज्ञ आणि कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांंनी हे आव्हान संधी म्हणून स्वीकारले पाहिजे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांंनी याबाबत अधिक संशोधन करणे आवश्यक आहे.
समुद्र किनाऱ्याजवळ असणाऱ्या गावात प्रयोग
चिखले, घोलवड, बोर्डी, रामपूर, वेवजी या गावांमध्ये गेल्या चार-पाच वर्षांत हंगामापूर्वी कलमे मोहरली आहेत. हा भाग समुद्रकिनारा आणि सह्याद्रीच्या जवळ असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील भौगोलिक व हवामानविषयक साम्य यात आढळते. त्यामुळे प्रयोग करण्यास वाव असल्याचे बागायतदारांचे
म्हणणे आहे.