फटाका विक्रेत्यांच्या विनापरवाना दुकानांना सील, राज्यात पहिलीच कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 02:26 AM2018-11-05T02:26:34+5:302018-11-05T02:27:04+5:30
शहरातील काही विक्रेते हे विनापरवाना फटाके विक्री करीत असल्याने नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी आज सायंकाळी त्यावर धाडी टाकून ती सील केली. ऐन दिवाळीत ही कारवाई केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.
- वसंत भोईर
वाडा - शहरातील काही विक्रेते हे विनापरवाना फटाके विक्री करीत असल्याने नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी आज सायंकाळी त्यावर धाडी टाकून ती सील केली. ऐन दिवाळीत ही कारवाई केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाडा नगरपंचायतीच्या हद्दीत पी्रतम सेल्स एजन्सी, नंदकुमार ट्रेडर्स, मनोरे ट्रेडर्स, पातकर ट्रेडर्स ही फटाक्यांची घाऊक दुकाने असून येथे दिवाळीच्या हंगामात करोडोची उलाढाल होत असते.
आज सायंकाळी वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रबोधन मवादे यांनी या दुकानांची तपासणी केली असता दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण केलेले नव्हते. तसेच सरुक्षिततेची दृष्टीकोनातून कुठलीही उपाययोजना न केल्याने मवादे यांनी तात्काळ दुकाने बंद करून सील ठोकले. मात्र ग्रामपंचायत हद्दीत असलेली दोन दुकाने या कारवाईतून बचावली आहेत. मुख्याधिकारी प्रबोधन मवादे यांनी ही धाडसी कारवाई केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात असून विनापरवाना दुकान मालकांवर गुन्हा दाखल होतो की काय? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी या दुकानांची तपासणी करण्याचे आदेश मला दिले होते. त्याअनुषंगाने मी तपासणी केली असता त्यांच्याकडे परवाने नुतनीकरण केले नव्हते तसेच सुरक्षिततेची दृष्टीकोन उपाययोजना केली नसल्याने कारवाई केली.
-प्रबोधन मवादे, मुख्याधिकारी
वाडा नगरपंचायत