कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महागाईचा उडाला भडका; सामान्यांनी जगायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 11:04 PM2021-04-27T23:04:20+5:302021-04-27T23:04:27+5:30
रोगप्रतिकारशक्तीच्या वस्तूंची भाववाढ : सामान्यांनी जगायचे कसे?
पारोळ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महागाईचा भडका उडाला असून, रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे आधीच रोजगार गमावलेल्या सर्वसामान्यांनी जगायचे तरी कसे, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, वसई, विरार, नालासोपारा परिसरात कोरोना रुग्णांमध्ये रोज मोठी वाढ होत आहे. आपल्याला कोरोनापासून वाचायचे असेल तर रोगप्रतिकारकशक्ती महत्त्वाची असून ती वाढवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची मोठी मागणी आहे.
बाजारात अनेक वस्तूंबरोबरच चिकन, मटण, अंडीसुद्धा महाग झाल्याने आता सामान्यांनी आपली प्रतिकारशक्ती वाढवायची कशी, असा प्रश्न विचारला जात आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी चिकन, मटण व अंडी खा, असा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे कडकडीत उन्हाळा असूनही चिकन, मटण व अंड्यांची मागणी वाढत आहे. त्यांचे दरही दुपटीने वाढले आहेत. ब्रॉयलर चिकनला १८० ते २४० रुपये, गावरान चिकनला ३०० ते ३५० रुपये, मटण ७००, तर एका अंड्यासाठी ८ ते १० रुपये मोजावे लागत आहेत. विक्री वाढल्याने विक्रेत्यांना अच्छे दिन आले आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून शेळी व कुक्कुटपालन शेतकरी करत आहेत. त्यामुळे त्यांना या वर्षी चांगला दर मिळत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी चिकन १५०, तर मटण ६०० रुपये किलोने विकले जात होते. तेच भाव आता वाढले आहेत. गेल्यावर्षी सुरूवातीला चिकन खाण्याबाबत गैरसमजही पसरले होते. आता मात्र आहारतज्ज्ञ चिकन, मटण, अंडी खाण्याचा सल्ला देत असल्याने विक्रीत व किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. दरम्यान, चिकन, मटण व अंडी विकणाऱ्यांनाही वेळ ठरवून दिल्याने त्यावेळेतच ती विकत मिळतात. त्यामुळे या दुकानांवर गर्दी पाहायला मिळत आहे.