नेपाळमधील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी विरारमधील तरुणांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 11:52 PM2021-03-27T23:52:29+5:302021-03-27T23:52:43+5:30
७ एप्रिलला होणार स्पर्धा : अर्नाळा-आगाशीमधील सात खेळाडू
पारोळ : नेपाळमध्ये ७ एप्रिलला आंतरराष्ट्रीय सॉफ्ट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघात विरारमधील सुपुत्रांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून सात खेळाडूंची या स्पर्धेसाठी निवड झाली असून, हे सातही खेळाडू विरारमधील अर्नाळा-आगाशी येथील आहेत. त्यांची ही निवड अर्नाळा-आगाशीवासीयांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
अर्नाळा- आगाशी येथे सामान्य कुटुंबामध्ये जन्म झालेल्या ह्या तरुणांना लहानपणापासून क्रीडा क्षेत्राची आवड असून, क्रिकेटमध्ये त्यांचे उत्तम वर्चस्व आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून वेगवेगळ्या क्रिकेट संघात हे तरुण सहभागी असतात. यामुळे सिनिअर नॅशनल टेनिस क्रिकेट स्पर्धेत त्यांना प्रथमच महाराष्ट्राच्या संघात खेळण्याची संधी मिळाली. त्या आनुषंगाने कन्याकुमारी येथे पार पडलेल्या सिनिअर नॅशनल टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघ उपविजेता ठरला. या संघात विरारमधील अर्नाळा गावातील प्रशांत घरत, जयेश घरत, विघ्नेश साखलतोडे, विकास धस्कर, अमित तांडेल, राहुल नाईक तर आगाशीमधील हितेश मेहेर या तरुणांनी उत्कृष्ट खेळ दाखवल्याने त्यांना नेपाळमधील पोखरा येथे ७ एप्रिल ते११ एप्रिल दरम्यान होणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी, टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाकडून निवडपत्र देण्यात आले आहे. या तरुणांच्या उत्कृष्ट खेळामुळे संपूर्ण देशात विरारकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.