पालघर तालुक्यात सेनेचे दोन दशकांपासून निर्विवाद वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 12:58 AM2020-01-10T00:58:45+5:302020-01-10T00:59:07+5:30
पालघर तालुक्याच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने २३ जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे.
पंकज राऊत
बोईसर : पालघर तालुक्याच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने २३ जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे. मात्र तालुक्यात भाजप आणि बहुजन विकास आघाडीला २०१५ च्या तुलनेत कमी जागा मिळाल्याने त्यांची मोठी पीछेहाट झाली आहे. सेनेने पंचायत समितीवरील आपला बालेकिल्ला मागील दोन दशकांपासून कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.
या निवडणुकीमध्ये काही आजी व माजी जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान पंचायत समिती सदस्य तसेच पालघर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दांडी गटात शिवसेनेसह तीन मुख्य राजकीय पक्षांचे उमेदवार तर रिंगणात होतेच त्याबरोबरच ८ अपक्ष उमेदवार उभे होते. तरीही शिवसेनेचे विद्यमान जि. प. सदस्य तुळशीदास तामोरे यांनी ४८१ मताधिक्क्याने विजय मिळवला. नवापूर गणात विद्यमान पं.स. सभापती मनीषा पिंपळे यांना बविआच्या अंजली बारी व राष्ट्रवादीच्या अक्षया संखे यांनी चांगली लढत दिल्याने त्या अवघ्या ९५ मताधिक्क्याने निवडून आल्या. जिल्हा परिषदेचे विद्यमान बांधकाम सभापती सुरेश तरे हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार नवघर घाटीम येथून ६२७ मताधिक्क्याने निवडून आले. तर पालघर जिल्हा परिषदेचे विद्यमान कृषी सभापती अशोक वडे यांची मुलगी सलोनी वडे व भाजप व शिवशक्ती सामाजिक संघटनेचे उमेदवार अजय दिवे हे भाजपचे फक्त दोनच उमेदवार तालुक्यात निवडून आले आहेत. या दोन्ही जागेवरील निवडणूक राजकीय वर्तुळात प्रतिष्ठेची समजली जात होती तर विद्यमान पं.स. सदस्य मुकेश पाटील सरावली व जतीन मेर मुरबे गटातून निवडून येत पुन्हा पं.स.वर गेले आहेत. शिवसेनेने किनारपट्टीबरोबरच निमशहरी व डोंगरी भागातही चांगले यश मिळविले आहे.
खैरापाडा येथे भाजपचे बंडखोर उमेदवार हरिनारायण शुक्ला यांच्यामुळे भाजपच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. शुक्ला यांना ३२७ मते मिळाली तर विजयी उमेदवार फक्त ४७ मतांनी निवडून आले. राष्ट्रवादीने २ तर मनसेने एका जागेवर विजय मिळवून पंचायत समितीत दाखल झाले आहेत. एकंदरीत तालुक्यातील काही गणात ही निवडणूक अटीतटीची झाली आहे.
>भाजप जिल्ह्यातून हद्दपार
२०१५ च्या निवडणुकीत बविआला १० तर या वेळी ४ जागा मिळाल्या होत्या. भाजपच्याही या निवडणुकीत दोन जागा कमी झाल्या आहेत.
लोकसभेतून व विधानसभेतून पालघर जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या भाजपला कंबर कसावी लागणार आहे.