भाजपाच्या दाव्यामुळे सेनेत टेन्शन; युतीतील मनोमिलन वरवरचे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 11:03 PM2019-03-11T23:03:24+5:302019-03-11T23:04:02+5:30
राजेंद्र गावितांसाठी जागा सोडण्यास वाढता विरोध
- हितेन नाईक
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या पालघर विधानसभा मतदारसंघावर भाजपाने दावा सांगितल्याने शिवसेनेत अस्वस्थता आहे. पालघरचा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने भाजपाकडून खेचून घेतल्याने त्या बदल्यात राजेंद्र गावित यांच्यासाठी भाजपाने पालघर विधानसभेवर दावा सांगितला आहे. तो देण्यास शिवसेनेच्या स्थानिक नेते, कार्यकर्त्यांचा विरोध असल्याने युतीतील खदखद बाहेर आली आहे. पालघरच्या सध्याच्या नगरपालिका निवडणुकीत ती दिसत नसली, तरी त्याचा परिणाम लोकसभेवर होऊ शकतो.
गेल्या विधानसभेत पालघरमध्ये युतीचे उमेदवार म्हणून विजयी झालेल्या शिवसेनेच्या कृष्णा घोडा यांच्या अकस्मात मृत्यू झाल्यानंतर रिक्त जागेवरील पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा अमित यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरोधात माजी राज्यमंत्री आणि सध्या भाजपामध्ये आलेल्या राजेंद्र गवित यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत अमित घोडा यांनी ६८ हजार १८१ मते मिळवत काँग्रेसच्या राजेंद्र गवित याचा १८ हजार ९४८ मतांनी पराभव केला होता. गावित यांना ४८ हजार १८१ मते मिळाली होती. आता गावित भाजपात आहेत आणि पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांनी शिवसेनचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा २९ हजार ५७२ मतांनी पराभव केला होता. आता युती झाली असली, तरी जिल्ह्यात अजूनही ती पदाधिकाऱ्यांत दिसत नाही.
पालघर विधानसभा अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्ष लढवत असला, तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या राजकारणाला कंटाळून आणि सत्तेतील पक्षातून मिळमाºया संधीचा विचार करून गावित यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस उभारी घेऊ शकलेली नाही. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार माजी खासदार दामू शिंगडा यांना अवघी ४७ हजार ७१४ मते मिळाली होती. जिल्हा परिषद, पंचायत समितीवर त्यांच्या पक्षाचा एकही सदस्य निवडून आला नसल्याने पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थेतील ताकदही नगण्य आहे. त्याचा फायदा उचलत पालघर विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला आहे.
वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी, एमआयडीसी मधील समुद्रात ७.१ किमी आत सोडलेली प्रदूषित पाण्याची पाईपलाईन, अणुऊर्जा प्रकल्पात स्थानिकांना नोकरीत न मिळणारे प्राधान्य, पोफरण-अकरपट्टी पुनर्वसनाचे अनेक वर्षांपासूनचे भिजत पडलेले घोंगडे, ओएनजीसीचे समुद्रातील सर्वेक्षण,समुद्रातील हद्दीचा वाद,महिलांचे मार्केट, पानेरी नदी, खाडी-खाजनांचे झालेले प्रदूषण आदी अनेक वर्षांपासून हे प्रश्न या विधानसभा क्षेत्रात भेडसावत असून या प्रश्नाचे निराकरण करण्यास शिवसेनेचे आमदार अमित घोडा सपशेल अपयशी ठरले आहेत.
राजकीय घडामोडी
युतीविरोधात आगाडीने येथील बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला असून त्याबद्दल विद्यमान आमदार अमित गोडा यांना जबाबदार धरले आहे. घोडा यांच्याऐवजी राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना येथील विकासाच्या प्रस्नांना तोंड द्यावे लागू शकते.
वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी, एमआयडीसीतील प्रदूषित पाण्याची वाहिनी, अणुऊर्जा प्रकल्पात स्थानिकांना नोकरीत न मिळणारे प्राधान्य, पोफरण-अकरपट्टी पुनर्वसनाचे अनेक वर्षांपासूनचे भिजत पडलेले घोंगडे, ओएनजीसीचे समुद्रातील सर्वेक्षण, समुद्रातील मच्छीमारांच्या हद्दीचा वाद, पानेरी नदी- खाडी-खाजणांचे प्रदूषण आदी अनेक प्रश्न या विधानसभा क्षेत्रात आहेत. त्यांची चर्चाही यानिमित्ताने होते आहे.
मच्छीमार, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि पर्यावरमाशी निगडित प्रश्न निवडणुकीच्या प्रचारात प्राधान्याने येण्याची शक्यता आहे.
दृष्टिक्षेपात राजकारण
पालघर लोकसभेवर वर्चस्वासाठी पोषक मतदारसंघ म्हणून पालघर ओळखला जातो. सध्या बहुतांश ग्रामपंचायतीवर शिवसेना-भाजपची सत्ता आहे. पालघर पंचायत समितीवर मागील २० वर्षांपासून शिवसेनेची सत्ता असून ३४ सदस्यांपैकी १९ सदस्य शिवसेनेचे तर भाजपचे चार असे २३ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे राजकीय पातळीवर पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद असल्याचे दिसून येते.
पालघर नगरपालिकेवर स्थापनेवेळच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. नंतर २००९ ला काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, जनाधिकार आणि शिवसेनेने सत्ता वाटून घेतली. त्यानंतर त्या नगरपालिकेवर शिवसेनेचा वरचष्मा आहे. गेल्या पाच वर्षांच्या शिवसेनेच्या सत्ताकाळात भाजपा सोबत नसली, तरी आता मात्र निवडणूक लढवताना युतीधर्म म्हणून दोन्ही पक्ष सोबत आहेत.
मतदार नोंदणीनुसार या विधानसभा क्षेत्रात एकूण २ लाख ६५ हजार ७७४ मतदार असून पुरु ष मतदार १ लाख ३५ हजार २२४ तर स्त्री मतदार १ लाख ३० हजार ५३७ इतकी आहे. त्यात सुशिक्षित मतदारांचा भरणा अधिक असल्याने आयटी सेल प्रचाराचा जोर आहे.