संभ्रमाची मालिका सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 10:56 PM2020-02-18T22:56:55+5:302020-02-18T22:57:10+5:30
अंबरनाथ पालिका निवडणूक : आयोगाकडून आरक्षण सोडत झालीच नाही
पंकज पाटील
अंबरनाथ/बदलापूर : राज्य निवडणूक आयोगाचे एकावर एक येणारे आदेश हे नागरिकांना संभ्रमात टाकणारे आहेत. निवडणूक आयोगाने आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने १८ फेब्रुवारीला आरक्षण सोडत घेण्याचे निश्चित केले होते. मात्र आयोगाने कोणतेही पत्र न काढता हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. नियमानुसार आणि आयोगाच्या आदेशानुसार आज आरक्षण सोडत पार पडणे अपेक्षित होते. मात्र तो कार्यक्रम झालाच नाही आणि त्याची कल्पनाही नागरिकांना दिलीच नाही. निवडणूक आयोग हे अधिकारी आणि स्वत:चे कार्यालय यांच्यापुरतेच काम करत असल्याचे चित्र या निवडणुकीच्या कार्यक्रमातून दिसत आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर या दोन ‘अ’ वर्ग नगरपालिकेच्या निवडणूक आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या आरक्षण सोडतीच्या आदेशानुसार प्रभाग रचना निश्चित करून त्या प्रभागांची आरक्षण सोडत १८ फेब्रुवारीला घेण्यात येणार होती. मात्र नगरपालिकेने निवडणूक आयोगाकडे सादर केलेली प्रभाग रचनाच अद्याप निश्चित झालेली नाही. त्या प्रभाग रचनेलाच अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
निवडणूक आयोगाकडून विलंब होत असल्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढे ढकलला जाणार अपेक्षित होते. मात्र त्या संदर्भात कोणतेही आदेश आयोगाने काढले नाही.
निवडणुकीचा कार्यक्रम सर्वच वर्तमानपत्रात प्रसिध्द झाल्याने याकडे सगळ््यांचे लक्ष लागले होते. आरक्षण सोडत तर दूरच १८ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेलाही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या विलंबामुळे शहरात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दुसरीकडे निवडणूक आयोग हे केवळ त्यांच्या अधिकाऱ्यांपर्यंतच आदेश देण्याचे काम करत आहेत. नागरिकांपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम जावू देत नसल्याचे समोर आले आहे. कोणताही लेखी आदेश नसताना आरक्षण सोडत पुढे गेलीच कशी हा प्रश्न उपस्थित होत आहे.
पालिका अधिकारी आयोगाकडे तळ ठोकून
च्निवडणूक आयोगाकडे प्रारुप प्रभाग रचना मंजूर करण्यासाठी अधिकारी तळ ठोकून आहेत. मात्र अद्याप त्यांना मंजुरी मिळालेली नाही.
च्प्रारूप आराखड्याला मंजुरी मिळाल्यावर आरक्षण सोडतीची तारीख निश्चित होईल असे मुख्याधिकारी देवीदास पवार यांनी स्पष्ट केले आहे.