सात कोटी उशिरा, गणवेष नाही
By admin | Published: June 17, 2016 12:41 AM2016-06-17T00:41:13+5:302016-06-17T00:41:13+5:30
शाळेच्या पहिल्या दिवसात नवीन पुस्तके नवीन गणवेशाच्या आनंदात उडया मारत शाळेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पालघर जिल्हयातील आठ तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या २ हजार ५२० शाळामधील
- हितेन नाईक, पालघर
शाळेच्या पहिल्या दिवसात नवीन पुस्तके नवीन गणवेशाच्या आनंदात उडया मारत शाळेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पालघर जिल्हयातील आठ तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या २ हजार ५२० शाळामधील लाखो विद्यार्थ्यांचा पुरता हिरमोड झाला आहे. शासनाकडून गणवेशासाठी येणारे सुमारे ७ कोटीचे अनुदान वेळवर न आल्याने ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांवर मागच्या वर्षीचा जुना गणवेष घालूनच शाळेत जाण्याची वेळ आली आहे.
पालघर जिल्हयातील आठ तालुक्यातील ४२३ शाळा, वसईमध्ये ५१५ शाळा, डहाणुमध्ये ४७१ शाळा, तलासरीमध्ये १७३ शाळा, वाडा तालुक्यात ३०० शाळा, विक्रमगड तालुक्यात २३६ शाळा, जव्हार तालुक्यात २४४ शाळा, मोखाडा तालुक्यात १५८ अशा २ हजार ५२० शाळा आहेत.
शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जाते परंतु ७ कोटीचा निधी वेळेवर उपलब्ध झाला नसल्याने विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशावरच शाळेत जावे लागत आहे.
या संदर्भात पालघर जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण सभापती सचीन पाटील म्हणाले की, अनुदान उशीरा आले. हा निधी राज्य शासनाने पुढील वर्षी जिल्हा परिषदेमार्फत देण्याचे आदेश काढल्यास सर्व विद्यार्थ्यांची मापे घेणे, टेलर्सची निवड करणे, कापड खरेदी करणे, इ. ची टेंडर प्रक्रिया शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने जलद गतीने राबविता येईल. व विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याआधीच गणेवेश वाटप करता येतील. (वार्ताहर)
युनिफॉर्म मिळणार कधी?
आता गणवेषासाठी लागणाऱ्या कपड्याची खरेदी होणार कधी, लाखो विद्यार्थ्यांची मापे घेणार कधी, ते शिवून मिळणार कधी? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. जाणकारांच्या मते आता हे गणवेष बहुधा दुसऱ्या सत्रात म्हणजे दिवाळीच्या सुटीनंतर मिळण्याची शक्यता आहे.