सात हजार नागरिकांना मिळणार मोफत प्रवासाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 01:04 AM2020-01-02T01:04:59+5:302020-01-02T01:05:02+5:30
वसई - विरार मनपाचा निर्णय : ज्येष्ठ, अपंग, रुग्णांचा समावेश
विरार : वसई - विरार महापालिकेने ज्येष्ठ नागरिक, अपंग, कर्करोग रुग्ण, डायलीसीस तसेच रक्तशुद्धीकरण अशा नागरिकांना मोफत परिवहन सेवा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार नागरिकांनी महापालिकेकडे अर्ज केले होते. याअंतर्गत ७ हजार ४०० नागरिकांनी नोंदणी केली आहे. लवकरच त्यांना मोफत बस सेवेचा लाभ मिळणार आहे.
महापालिकेच्या परिवहन सेवेतर्फे यापूर्वीही विद्यार्थ्यांना मोफत बससेवा दिली जात होती. त्यांनतर आता १ डिसेंबर २०१९ पासून ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस पास मिळण्यासाठी प्रभाग समिती निहाय पालिकेने अर्ज उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे ज्या नागरिकांचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशा ज्येष्ठ नागरिकांना विनातिकीट शहरांतर्गत बस प्रवास करता येणार आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर प्रवीण शेट्टी आणि परिवहन समिती सभापती प्रीतेश पाटील यांनी केले होते. त्यानुसार नागरिकांनी आपले कागदपत्र सादर करून अर्ज केले होते. पहिल्या टप्प्यात आतापर्यंत ७ हजार ४०० नागरिकांच्या नावाची नोंद झाली. या सर्व नागरिकांना नुकतेच परिवहन सेवेच्या मोफत पासचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक, अपंग, कर्करोग रुग्ण, डायलीसीस तसेच रक्तशुद्धीकरण अशा नागरिकांना आता मोफत बस सेवेचा लाभ घेता येणार आहे.
नोंदणी झालेल्या प्रवाशांना मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. तसेच पास वितरण करण्यात येत आहे.
-प्रीतेश पाटील, परिवहन सभापती