तारापूर येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र केले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 01:18 AM2021-01-14T01:18:38+5:302021-01-14T01:18:51+5:30
शेकडो उद्योगांचे उत्पादन होणार ठप्प : दीड लाख कामगारांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न
पंकज राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : तारापूर एमआयडीसीतील २५ एमएलडी क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर (सीईटीपी) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुन्हा बंदची करवाई केली आहे. यामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील शेकडो उद्योगांच्या उत्पादनावर आणि हजारो कामगारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
तारापूर येथील सीईटीपीतून नवापूरच्या समुद्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेमून दिलेल्या माप-दंडकानुसार प्रक्रिया होत नसल्याने तसेच सांडपाण्यातील केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक पटीने असल्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गोळा केलेल्या नमुन्यामध्ये आढळून आले. त्याचबरोबर अनेक त्रुटी निदर्शनास आल्यानंतर आणि अनेक वेळा सुधारण्याची संधी देऊनही फारसा फरक नसल्याने जुन्या सीईटीपीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये लघु, मध्यम व मोठे असे सर्व मिळून सुमारे साडेअकराशे उद्योग कार्यरत असून त्यापैकी प्रतिदिन २५ दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या या जुन्या सीईटीपीमध्ये प्रक्रियेसाठी सांडपाणी पाठविणाऱ्या उद्योगांची संख्या ६०० च्या आसपास असून, एनजीटीने एमआयडीसीतील उद्योगांच्या पाणीपुरवठ्यात ४० टक्के पाणी कपात करण्यापूर्वी या सीईटीपीमध्ये औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांमधून मागील अनेक वर्षे सुमारे ४० ते ५० एमएलडी सांडपाणी येत होते. त्या अतिरिक्त येणाऱ्या सांडपाण्यावर अपेक्षित व पुरेशी प्रक्रिया न करताच ते सांडपाणी सरळ नवापूरच्या समुद्रात सोडले जात होते. त्यामुळे पर्यावरणाच्या झालेल्या हानीबरोबरच मच्छिमारांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर आणि मासेमारी व शेतीवर झालेल्या गंभीर परिणामामुळे अखिल भारतीय मांगेला परिषदेने राष्ट्रीय हरित लवादा (एनजीटी)कडे याचिका दाखल करून ते यशस्वीपणे लढा देत आहेत.
कारवाई का?
माप-दंडकानुसार प्रक्रिया होत नसल्याने तसेच सांडपाण्यातील केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक पटीने असल्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गोळा केलेल्या नमुन्यामध्ये आढळून आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
नोव्हेंबर अखेरपासून जुन्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची सुधारणा करण्यासाठी केंद्र स्वयंस्फूर्तीने बंद करण्यात आले होते. या प्रक्रिया केंद्राला जोडलेल्या सर्व उद्योगांतील शौचालय व मानवी सेवन आणि वापरासाठी लागणारे पाणी सीईटीपीत येत होते. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने आक्षेप नोंदवला आहे, तर नवीन २५ एमएलडी क्षमतेचा सीईटीपी कार्यरत असून, या ठिकाणी ११ एमएलडी सांडपाणी सध्या येत आहे. उर्वरित उद्योगांमधील व विशेषता जुन्या सीईटीपीला जोडलेल्या उद्योगांची सांडपाण्याची लाईन नवीन सीईटीपीला जोडणी करण्यास एमआयडीसी असमर्थ ठरल्याने येथील सुमारे दोनशे-अडीचशे उद्योगांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.
- डी. के. राऊत, अध्यक्ष,
तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टीमा)