मुलींचे लैंगिक शोषण : पोलिसासह मैत्रिणीला केले सेवेतून निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 06:02 AM2023-08-12T06:02:18+5:302023-08-12T06:03:09+5:30
गुन्हा दाखल होताच अटक; सेवेत असताना प्रशिक्षण केंद्र कसे चालवत होते?
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : खासगी पोलिस प्रशिक्षण क्लास घेत दोन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. याबाबत मुलींनी आपल्या आईवडिलांकडे तक्रार केली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच याची तत्काळ दखल घेण्यात आली आहे. पोलिसासह त्याच्या मैत्रिणीला पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलिस सेवेत असताना खासगी पोलिस प्रशिक्षण केंद्रात कसे काय चालवत होते? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. या दोन्ही पोलिसांना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे अभय होते का? असाही सवाल केला जात आहे. दरम्यान, दोघांवरही गुन्हा दाखल होऊन अटक झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
पोलिस खात्यात सेवेत असताना किंवा निलंबित असताना उपजीविकेसाठी कोणताही व्यवसाय करू शकत नाहीत, असा नियम आहे. समाधान गावडे (२८) आणि त्याची २५ वर्षीय पोलिस मैत्रीण रेल्वे पोलिस म्हणून कार्यरत असताना पोलिस भरती प्रशिक्षणाचे क्लासेस कसे चालवायचे? याबाबत वरिष्ठांना दोघांनी कळविले होते का? वरिष्ठांनी त्यांच्याकडून लेखी खुलासा घेतला होता का? असे प्रश्न विचारले जात आहेत.
गावडे हा नालासोपारा येथे ‘विजयी भव’ नावाची खासगी पोलिस अकादमी चालवत असे. शहरात स्वत:चे गणवेशातील मोठे फोटो टाकून रेल्वेस्थानकाच्या परिसरात बॅनरबाजी केली होती.
वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे मौन
वसई रेल्वे पोलिस ठाण्यातील दोन आरोपी पोलिसांवर विनयभंग, पोक्सो तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत नालासोपाऱ्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी रेल्वेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन इंगवले यांना गुरुवारपासून संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.