जव्हारचे अंदाजपत्रक शिलकी
By Admin | Published: February 23, 2017 05:33 AM2017-02-23T05:33:11+5:302017-02-23T05:33:11+5:30
मंगळवारी झालेल्या जव्हार नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिलकी अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात
हुसेन मेमन/ जव्हार
जव्हार : मंगळवारी झालेल्या जव्हार नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिलकी अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली. ही सभा सकाळी ११.०० वा. राजीव गांधी स्टेडीयम मधील तेंडुलकर पेव्हेलियन येथे झाली, यावेळी नगराध्यक्ष संदिप वैद्य, उपनगराध्यक्ष आशा बल्लाळ, माजी नगराध्यक्ष रियाज मनियार, नगरसेवक संजय वांगड, अमोल औसरकर, कांचनमाला चुंबळे व इतर नगरसेवक तसेच मुख्याधिकारी वैभव विधाते, नगर अभियंता बी.डी. क्षीरसागार व कमर्चारी वृंद उपस्थित होता.
हे अंदाजपत्रक मुख्याधिकाऱ्यांनी थेट सर्वसाधारण सभेत सादर केले. कारण जानेवारी २०१७ मध्ये स्थायी समिती स्थापन झालेली नव्हती. त्यात जमा २० कोटी २७ लाख २७ हजार २१७ व खर्च १९ कोटी २८ लाख ११ हजार २१७ प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे त्यात
४ लाख ४२ हजार ७१७ रूपये शिल्लक राहणार आहेत. यंदा मालमत्ता करात कोणतीही वाढ सुचविलेली नाही. नगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार किमान २२-२७ टक्के दराने मालमत्ता कर आकारता येतो. परंतु सध्या तो २४ टक्के असल्याने त्यात वाढ केलेली नाही.
सन २०१७-१८ मध्ये एकत्रित करापोटी रू. ६७.७५ लाख, शैक्षणिक करापोटी रू. १८लाख, वृक्षकर ३ लाख, रोजगार हमी ३ लाख, एवढा कर वसूल होणे अपेक्षीत आहे. या करापैकी शिक्षण व रोजगार हमी कराचा भरणा शासनाकडे केला जातो, त्यासाठी नगर परिषदेस कराच्या वसुलीप्रमाणे ३.५ टक्के रिबेट मिळतो.
पालिका क्षेत्रात मुख्य ठिकाणी छोटे-छोटे व्यवसाय करण्यासाठी जागा, टपऱ्या, गाळे कार्यालयासाठी इमारती भाडे तत्वावर दिलेल्या आहेत. तसेच परिषदेच्या संपूर्ण प्रशासकिय व लेखाविभागाकडील कामाचे संगणकीकरण करण्यात आले असून, त्यासाठी नागरी सुविधा केंद्र अद्यावत करून नागरीकांसाठी खुले करण्यात आलेले आहे. उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तसेच अग्निशमन सेवा सुरू करण्यात आली आहे.
खडखड धरणातून पाणी पुरविणारी योजना अंतिम टप्प्यात
शहरात दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्याची अत्यंत कमतरता भासते त्यासाठी जयसागर धरणाच्या भिंतीचे मजबुतीकरण करून पाणी साठ्याचे क्षेत्रफळ वाढविल्यामुळे पाणी साठ्यात वाढ झालेली आहे. तसेच शहराला खडखड धरणातून पाणी पुरविणाऱ्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून त्याचा लाभ लवकरच जव्हारकरांना मिळणार आहे. तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रियेसाठी अर्थसंकल्पात रू. ५० लाखांची तरतूद केलेली आहे. १ सप्टेंबर २०१८ रोजी परिषदेला १०० वर्ष पूर्ण होत आहे.या सोहळ्याठी ५ लाखांची तरतूद आहे.
पथदिव्यांसाठी नवीन पोल खरेदी करण्यासाठी आणि नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यावरील डिव्हायडरवर उभारण्यासाठी पोल खरेदी करणे यासाठी १५ लाखांची व विद्युत खांबांवरील एल.ई.डी. दिवे खरेदीकरीता रू. ५ लाखांची तसेच शहराच्या प्रवेशद्वारांवर कमानी उभारण्यासाठी २० लाख, नगर परिषदेसाठी सुसज्ज सभागृह बांधण्याकरीता ५ लाख, सूर्य तलावातील गाळ काढण्यासाठी ५लाख अशा तरतूदी करण्यात आले आहे.
जव्हाची लोकसंख्या १५ हजार पेक्षा कमी असल्याने मान्य खर्चावर १०० टक्के शासकिय अनुदान मंजूर आहे. त्याकरीता एकूण तरतूद १ कोटी ८० लाख ८५ हजार तर शासकिय अनुदान १ कोटी ७५ लाख ५० हजार व नगर परिषद अनुदान २ लाख ३५ हजार अपेक्षित आहे.