शार्क प्रजाती वन्यजीव कायदा मच्छीमारांसाठी ठरतोय जाचक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 01:43 AM2020-08-21T01:43:44+5:302020-08-21T01:44:02+5:30

दरम्यान, मुंबईच्या ससून डॉक येथे एका व्हेल माश्याची खरेदी करणाऱ्या व्यापाºयाविरोधात गुन्हा दाखल झाला असून मच्छीमाराचा शोध सुरू आहे.

The Shark Species Wildlife Act is a nuisance for fishermen | शार्क प्रजाती वन्यजीव कायदा मच्छीमारांसाठी ठरतोय जाचक

शार्क प्रजाती वन्यजीव कायदा मच्छीमारांसाठी ठरतोय जाचक

Next

हितेन नाईक
पालघर : भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने शार्कच्या १० प्रजाती तसेच पाकट, लांजा माशांच्या काही प्रजाती या वन्य जीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत समाविष्ट केल्याने अशा माशांची मासेमारी केल्यास तीन वर्षांची शिक्षा आणि दंड अशा शिक्षेचे प्रयोजन असल्याने किनारपट्टीवरील मच्छीमारांना हा कायदा जाचक ठरणार आहे. दरम्यान, मुंबईच्या ससून डॉक येथे एका व्हेल माश्याची खरेदी करणाऱ्या व्यापाºयाविरोधात गुन्हा दाखल झाला असून मच्छीमाराचा शोध सुरू आहे.
सागरी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वोच्च भक्षक म्हणून शार्क माशाची ओळख आहे. सुमारे ५०० हून अधिक शार्क माशांच्या प्रजाती जगातील महासागरात अस्तित्वात आहेत. या माशांची मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाऊ लागल्याने या प्रजातीचे अस्तित्व अवघे १० टक्क्यांवर आले आहे. शार्क मासे हे वषार्नुवर्षे चाललेल्या सामूहिक विलोपणातून आपले अस्तित्व टिकवून असले तरीही बेसुमार आणि अनियंत्रितपणे सुरू असलेल्या मासेमारीपासून आपला टिकाव धरण्याइतपत शार्क माश्यात बदल झालेला नाही. त्यांचा दरवर्षी वाढत जाणारा मृत्युदर हा जन्मदराशी सुसंगत राहिलेला दिसून येत नसल्याचे सीएमएफआरआयच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
सर्वाधिक शार्कच्या प्रजाती या अंदाजे त्यांच्या कमाल आकाराच्या निम्म्या आकारापर्यंत वाढल्याशिवाय परिपक्व होत नाहीत. शार्क माशांचा गर्भावस्थेचा कालावधी हा दीर्घकालीन असून तो जवळपास एक वर्ष किंवा त्याहून अधिक असतो. एकाच वेळी पिलांना जन्म देण्याची क्षमता ही फार कमी असल्याने ती २ ते १५ पिल्ले एवढीच मर्यादित असते. शार्क माशाच्या जवळपास ९७ टक्के प्रजाती या मानवास हानीकारक नाहीत. त्यामुळे मानवजातीने सुद्धा त्यांना हानी न पोहोचवता त्यांचे सुरक्षितपणे जगण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
>लहान मच्छीमार सापडणार संकटात
सुमारे २५ वर्षांपासून शार्क माशांची ८० ते १०० नॉटिकल समुद्री क्षेत्रात केली जाणारी मासेमारी जिल्ह्यात पूर्णत: बंद करण्यात आली आहे. मात्र वागरा पद्धतीच्या जाळ्यात शार्क मासे आदी प्रजाती अडकून मृत्यू पावल्याने मच्छीमार नाइलाजाने ते मासे किनाºयावर आणीत असतात. लहान मच्छीमारांनी दालदा (गिलनेट) पद्धतीने पापलेट अथवा लहान होडीद्वारे पापलेट आणि बोंबील माशांच्या मासेमारीला जाळे समुद्रात टाकल्यानंतर लहान मुशी (शार्क पिल्ले) त्यात अडकतात. जाळे टाकल्यानंतर ६ ते ७ तासांनी जाळे नौकेत घेतल्यावर अनेक मासे मृतावस्थेत अडकून पडलेले असतात. त्यामुळे नाईलाजाने त्यांना आणावे लागत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
>शार्कचे अस्तित्व धोक्यात
शार्क माशांच्या पंखांना परदेशात मोठी मागणी असल्याने मोठ्या ट्रॉलर्सद्वारे मासेमारी केली जात असून अनियंत्रित मासेमारीचा फटकाही या माश्यांना बसून त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शार्कचे पंख, दाढा, घोळ, शिंगाळा, वाम आदी माशांच्या पोटातील भोत (हवेची पिशवी), खरेदी करण्याच्या व्यवसायावर परप्रांतीय व्यापाऱ्यांची मक्तेदारी आहे. सौंदर्य प्रसाधने, उच्च प्रतीचे अत्तर, शस्त्रक्रियेचे धागे आदी बनविण्यासाठी याचा वापर होत आहे.
>सीएमएफआरआयला अथवा मत्स्यव्यवसाय विभागाला कळवा
शार्क, पाकट, लांजा आदी प्रजातीची मासेमारी आणि त्यांचा व्यवसाय करणे वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत दखलपात्र गुन्हा असून असा गुन्हा करणाºयास तीन वर्षापर्यंत कारावास व २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. शासनाने संरक्षित केलेल्या प्रजाती जिवंत किंवा मृत कळत किंवा नकळत पकडल्यास त्याची माहिती जवळच्याच सीएमएफआरआयच्या संशोधन कार्यालय किंवा क्षेत्रीय कार्यालयाकडे द्यावी.सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाकडेही तक्रार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या लोप पावणाºया शार्क माशांच्या प्रजाती जिवंत पकडल्यास त्यांना पुन्हा समुद्रामध्ये सोडण्यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न करणे गरजेचे असून त्यासाठी मच्छीमारांना २५ हजाराचे बक्षीसही देण्यात येत असल्याचे सहायक आयुक्त अजिंक्य पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पालघर, ठाणे जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना कळवून त्यांच्या नौकामालकांना या कायद्याबाबत अवगत करायला लावून सदरचा गुन्हा घडणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतही कळवण्यात आले आहे.

Web Title: The Shark Species Wildlife Act is a nuisance for fishermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.