‘ती’ बांधकामे हटविण्यास सुरुवात; जेएनपीटी-नवी दिल्ली कॉरिडोर प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 11:39 PM2020-12-29T23:39:23+5:302020-12-29T23:39:33+5:30
जेएनपीटी-नवी दिल्ली कॉरिडोर प्रकल्प : अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई
नालासोपारा : जेएनपीटी ते नवी दिल्ली कॉरिडोरकरिता नालासोपारा पूर्वेकडील बिलालपाड्याच्या जमिनीतून रेल्वे जाणार आहे. या जागेवरील लोकांना रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच मोबदला दिलेला असून त्यांची घरे व अनधिकृत टपऱ्यांवर वसईच्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर यातील अधिकाऱ्यांनी, तुळिंज पोलीस आणि जेसीबी, पोकलेनच्या साहाय्याने मंगळवारी सकाळच्या वेळी कारवाई केली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील बिलालपाडा येथील सर्व्हे नंबर ७३, ८५, ९५, ५ यातून रेल्वे जाणार आहे. या जागेमध्ये ३०-४० कच्ची घरे असून या घरांमध्ये कोणीही राहात नाही.
तसेच अनधिकृत टपऱ्या आहेत. तसेच सर्व्हे नंबर ३ मध्ये सन २०१३ मध्ये अंदाजे १०० रूम असून ते त्या ठिकाणी राहात होते. हे अतिक्रमण काढण्याकरिता मंगळवारी सकाळी मोहीम राबविली होती. या भूसंपादित जागेमध्ये राहणाऱ्या लोकांना यापूर्वीच मोबदला देण्यात आला होता. ही बांधकामे हटवण्यासाठी व कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून वसईच्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी २२ डिसेंबरला कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त पाहिजे, म्हणून पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना पत्रव्यवहार केला होता.
तुळिंज पोलिसांनी या कारवाई दरम्यान दोन पोलीस अधिकारी, पाच पोलीस कर्मचारी, पाच महिला पोलीस कर्मचारी निःशुल्क बंदोबस्त दिला होता. या विभागातील वसईचे सिव्हिल विभागातील वरिष्ठ कार्यकारी अधिकारी जी.बी. हेरोडे (४६) यांच्याकडून रीतसर माहिती घेऊन तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्त दिला होता. त्यानुसार बिलालपाडा परिसरातील घरांसह अनधिकृत टपऱ्या यावर संपूर्ण बंदोबस्तात जेसीबीद्वारे कारवाई करून जमीनदोस्त केलेे.