ओहळाच्या पाण्यावर पिकवली सिमला मिरची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:10 PM2020-02-11T23:10:34+5:302020-02-11T23:10:40+5:30
अडीच एकर जागेत उत्पादन : दिवसाआड निघते सहाशे किलो, पदवीनंतर नोकरी न करता करायला लागला शेती
भातसानगर : अवकाळी पावसाने त्रासल्यानंतरही शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली ढासळलेली स्थिती सुधारण्यासाठी अनेक पर्यायांचा वापर करत आहेत. येथील एका शेतकºयाने ओहळाच्या पाण्यावर अडीच एकर जागेत सिमला मिरचीचे उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे.
तालुक्यातील दहागाव येथील शेतकरी संजय पवार या शेतकºयाने आपल्या बाजूस असलेल्या ओहळाच्या पाण्यावर मिरचीचे उत्पादन घेणे सुरू केले आहे. यावर्षी पावसाळा अधिक लांबल्याने उशिरा का होईना सिमला मिरचीची लागवड केली. ओहळाच्या पाण्याचा योग्य वापर करून त्याने हे उत्पादन घेण्यास सुरूवात केली. सद्यस्थितीत दिवसाआड सहाशे किलो इतकी मिरची निघत असून त्या मिरचीला ३० ते ३२ रूपये किलोप्रमाणे भाव मिळतो. हे उत्पादन आणखी दोन महिने घेणार असल्याचे संजय याने सांगितले. आतापर्यंत एक ते सव्वालाख खर्च झाला असून तो खर्च वजा जाता बाजारभाव व पीक असेच राहिल्यास दीड लाखापर्यंत फायदा होऊ शकतो. पदवीनंतर नोकरीची आशा न ठेवता त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर शेती करण्यास सुरूवात केली.
दरम्यान, शहापूर तालुक्यात प्रयोगशील शेतकरी विविध उत्पादने घेत आहेत.
संजय पवार यांची सिमला मिरचीची लागवड व आलेले उत्पादन वाखाणण्याजोगे आहे. याच पद्धत्तीने शेतीत बदल घडवून आणणे आवश्यक आहे.
- विलास झुंजाराव,
कृषी अधिकारी