शिरगावला वृक्षारोपण
By admin | Published: July 9, 2015 11:12 PM2015-07-09T23:12:28+5:302015-07-09T23:12:28+5:30
शिरगावच्या निसर्ग संपन्न समुद्रकिनाऱ्यावरील सरकारी जागावर होणारी अतिक्रमणावर कारवाई करून शिरगाव ग्रामपंचायतीने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्याने साडेतीन
पालघर : शिरगावच्या निसर्ग संपन्न समुद्रकिनाऱ्यावरील सरकारी जागावर होणारी अतिक्रमणावर कारवाई करून शिरगाव ग्रामपंचायतीने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्याने साडेतीन एकर जागेवर सुमारे अडीच ते तीन हजार वृक्षांची लागवड केली. या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी एका-एका दासाकडे देण्यात आली असून ते झाडांची पुत्रवत काळजी घेणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे या किनाऱ्याची धूप रोखली जाऊन सौदर्यात मोठी भरही पडणार आहे. यावेळी रेवदंडाच्या धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्याचा आदर्श घ्यायला हवा असे उद्गार उपविभागीय पोलीस अधिकारी बजबळे यांनी काढले.
पालघर तालुक्यातील शिरगाव येथील पोर्तुगीजाकडून चिमाजी आप्पांनी जिंकून घेतलेला भव्य किल्ला, लगतच असलेला स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा, बागायती क्षेत्रामुळे राज्यशासनाने शिरगावला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे.
त्यामुळे पश्चिमेकडील समुद्रकिनाऱ्याजवळील सरकारी जागेवर अनेक लोकांनी अतिक्रमण केली होती ती शिरगाव ग्रामपंचायतीने दूर केल्या नंतर मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करण्याचा नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा प्रस्ताव शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचा चिण्मयी मोरे व उपसरपंच इम्रान दांडेकर यांनी उचलून धरला. या सर्व जागांची साफसफाई करण्यासाठी प्रतिष्ठानच्या दासांचे तीन ते चार हजार हात दोन दिवसापासून झटत होते.
जि. प. सदस्य बाबलीन मोरे यांच्या हस्ते अडीच ते तीन हजार झाडांची लागवड यावेळी करण्यात आली. पंतप्रधानानी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज सर्वत्र वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य जोमाने सुरू असून या कार्याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी असे आवाहन पोलीस अधिकारी बजबळे यांनी केले. (वार्ताहर)