विस्तव न जाणारे शिवसेना-बविआ नेतृत्व आले एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 11:42 PM2021-04-23T23:42:43+5:302021-04-23T23:42:57+5:30
अग्नितांडवानंतर आढावा बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसई-विरारच्या राजकारणात सत्ताप्राप्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असलेली शिवसेना आणि महापालिकेच्या स्थापनेपासून सत्तेवर असलेली बहुजन विकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एरवी विस्तवही जात नाही. मात्र, शुक्रवारी या दोन्ही पक्षांचे नेते अग्नितांडवाच्या घटनेनंतर एकत्र आल्याचे आणि किमान तासभर त्यांनी आढावा बैठक घेतल्याने आगीच्या घटनेबरोबरच या बैठकीचीही चर्चा शहरात सुरू होती.
विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेसंदर्भात व वसई-विरार महापालिका हद्दीतील पालिका व खाजगी रुग्णालयांतील सोयी-सुविधा, दक्षता आणि रुग्णांना सुरक्षितता अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी या जळीत घटनेच्या निमित्ताने का होईना, मात्र कधी एकमेकांना न भेटणारे
किंवा संपर्कात नसणारे शिवसेनेचे नेते मात्र विरार दरबारी शुक्रवारी सकाळी एकत्र आले.
याप्रसंगी विजय वल्लभ रुग्णालयाला भेट दिल्यानंतर शिवसेना व बविआ नेतृत्व एकत्रित येऊन त्यांनी विरारच्या विवा कॉलेजमधील आ. हितेंद्र ठाकूर यांच्या बविआ पक्ष कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी सकाळी ११ वाजता एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली.
यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, माजी महापौर प्रवीण शेट्टी, आयुक्त गंगाथरन डी. आदी यावेळी उपस्थित होते. तासभर संपन्न झालेल्या या आढावा बैठकीत महापालिका हद्दीतील सर्व रुग्णालयाचे फायर ऑडिट, शहरात अपुरा असलेला ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिविर इंजेक्शन, औषधे त्याचबरोबर रुग्णालय सोयी-सुविधा आणि रुग्णांची सुरक्षितता यामध्ये प्रामुख्याने शहरातील मोठ्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजन प्लांट उभारणी करण्यास मदत करणे व त्यांना यासाठी शासनाच्या वतीने सबसिडी देणे, तसेच बंद औद्योगिक वसाहती आस्थापना आहेत. त्यांच्याकडून रिकामी सिलिंडर्स मागवून घेणे अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. यावेळी पालकमंत्री भुसे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या आढावा बैठकीत झालेल्या सर्व विषय व समस्येची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाईल आणि स्थनिक पातळीवर जे काही करता येईल त्याबाबत पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी लक्ष केंद्रित करायच्या सूचना या बैठकीत मंत्री व पालकमंत्री यांनी दिल्या.
ऑक्सिजन आणि रेमडेसिविर
उपलब्ध करण्यावर झाली चर्चा
nविरार : विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर पालकमंत्री, नगरविकास मंत्री यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला.
nबैठकीत पालिका हद्दीतील रुग्णालयांचे फायर ऑडिट, मोठ्या रुग्णालयाला ऑक्सिजन प्लँट उभारण्यास मदत करणे, त्यांना यासाठी सबसिडी देणे, बंद इंडस्ट्रीजकडून रिकामी सिलिंडर मागून घेणे, ज्याचा उपयोग ऑक्सिजन भरण्यासाठी होऊ शकेल, अशा बाबींवर चर्चा करण्यात आली.