शिवसेना-बविआचे जमेना! जिल्ह्यात महाविकास आघाडीची शक्यता धूसर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 02:01 AM2019-12-27T02:01:57+5:302019-12-27T02:02:08+5:30
जिल्ह्यात महाविकास आघाडीची शक्यता धूसर : मनीषा निमकरांच्या उमेदवारीने संकेत
हितेन नाईक
पालघर : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपला जिल्ह्यातून हद्दपार करून आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीची आवश्यकता सेना-बविआच्या एकत्र न येण्याने धूसर वाटू लागली आहे. त्यामुळे आपला अंतर्गत मित्र असलेल्या भाजपशी सत्तास्थापनेदरम्यान युती करून अध्यक्षपद मिळविण्याचे प्रयत्न बविआकडून होण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये गेलेल्या पण पुन्हा बविआमध्ये येत जि.प.ची निवडणूक लढविणाऱ्या माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांच्या उमेदवारी अर्जावरून तरी हे स्पष्ट होत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
जिल्हा निर्मितीनंतर जानेवारी २०१५ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी वगळता सर्वच पक्षांनी एकला चलो रेचा नारा देत निवडणुका लढल्या होत्या. ५७ जगांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे २१, शिवसेना १५, बविआ १०, माकप ५, राष्ट्रवादी ४, काँग्रेस १ व १ अपक्ष असे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे भाजप-शिवसेनेची युती होत अध्यक्षपदी भाजप तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे होते. तर बविआने बाहेरून पाठिंबा दिल्याने आपल्याकडे सभापतीपद मिळविण्यात ते यशस्वी ठरले होते. आता मात्र राज्यातील राजकीय समीकरणे बदलली असून शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेत काँग्रेस-राष्ट्रवादीशी संधान साधून मुख्यमंत्रीपद आणि सत्ता मिळविल्याने भाजप-सेनेतील दरी दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे. त्याचे पडसाद जिल्ह्यात ७ जानेवारी रोजी होणाºया जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर उमटू लागले आहेत. राज्यात असलेली सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी-बविआ अशी महाविकास आघाडी पालघर जिल्ह्यात आकारास येत नसल्याने सध्या तरी सर्वच जागांवर आपल्या राजकीय ताकदीवर उमेदवारी अर्ज भरण्याचा कल सर्वच राजकीय पक्षांचा दिसून आला आहे. या महाविकास आघाडीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून सेनेला आपल्या काही जागांवर पाणी सोडावे लागणार असल्याने स्थानिक पदाधिकारी या आघाडीसाठी इच्छुक नसल्याचे कळते. शिवसेना व बविआ हे सध्या राज्यपातळीवर महाविकास आघाडीत एकत्र नांदत असले तरी जिल्ह्यातील राजकारणात हे दोन्ही पक्ष एकमेकांचे शत्रू म्हणून ओळखले जातात.
भाजपमध्ये रंगू लागला नवे-जुने वाद
लोकसभा व विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजपला जिल्ह्यातून हद्दपार करीत शिवसेनेसह अन्य पक्षांनी जिल्हा परिषदेवर नव्याने वर्चस्व स्थापनेची संधी निर्माण केली आहे. सध्या भाजपच्या जिल्ह्यातील ताकदीवर एकही आमदार व खासदार निवडून आला नसल्याने मर्यादा आल्या आहेत. त्यातच नव्याने भाजपमध्ये नवे व जुने असा वाद पुन्हा रंगू लागल्याने आधीच कमजोर झालेल्या या पक्षाला या अंतर्गत राजकारणाचा मोठा फटका बसून त्यांची घसरण या निवडणुकीत होऊ शकते, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसत आहे. तर दुसºया बाजूला या निवडणुकीत पडलेल्या आरक्षणामुळे निवडणुकीला मुकलेले सेनेचे काही पदाधिकारी आपली वेगळी टीम तयार करीत पडद्यामागून ‘रिमोट कंट्रोल’ची भूमिका निभावण्याची तयारी करीत आहेत.
बविआ सत्ता राखणार?; नव्या राजकीय समीकरणांचा होणार उदय?
मंगेश कराळे
च्नालासोपारा : पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. वसई तालुक्यातील सत्ता बहुजन विकास आघाडी राखण्यात यशस्वी ठरते की या ठिकाणी महाविकास आघाडीच्या धर्तीवर काही नवीन समीकरणे पाहायला मिळतात का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर हे वसईतील राजकीय वर्चस्वासाठी आपली ताकद पणाला लावण्याची शक्यता आहे.
च्पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील निवडणुकांमध्ये भाजपने वरचष्मा ठेवला. मात्र वसई तालुका हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. येथे बहुजन विकास आघाडीची एकहाती राजकीय ताकद आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेतील हुकमी सत्ता, तीन आमदार, तसेच पालघर जिल्हा परिषदेतील १० जागा, वसई पंचायत समितीवरील एकहाती सत्ता, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांत बविआने आपला दम दाखवला आहे.
च्पुढील वर्षारंभी होत असलेल्या निवडणुका पाहता बविआची वसईतील राजकीय ताकद मोठी आहे. त्यामुळे यंदा वसई तालुक्यातील ८ गणांमध्ये पुन्हा बविआला मोठा विजय मिळू शकतो असे एकंदर चित्र आहे. चंद्रपाडा आणि तिल्हेर या दोन गणांत बविआला गत निवडणुकांत थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता तर तिल्हेर गटातील जिल्हा परिषदेची जागाही निसटली होती. या तिन्ही जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी बविआने राजकीय व्यूहरचना तयार आखली आहे. ती .यशस्वी ठरते का पाहायचे.
च् मागील पंचायत समितीच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी ६ जागा व जनआंदोलन यांनी २ जागा आपल्या ताब्यात घेतल्या होत्या व यावेळी शिवसेना व जन आंदोलन यांची युती होती. बहुजन विकास आघाडीने जास्त जागा घेत या पंचायत समितीवर सत्ता मिळवली होती. वसई तालुक्यातील आगामी पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसईतील आठ गणांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये चार गणांमध्ये महिलांसाठी आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे.
वाड्यात शिवसेनेची वेगळी चूल, विविध पक्ष, आघाड्याही स्वबळावर
वाडा : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगूल वाजले असून राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या नजरा वाड्याकडे लागल्या आहेत. वाड्याचा गड सर करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची धडपड सुरू आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीच्या बैठका पार पडल्या, मात्र मार्ग न निघाल्याने शिवसेनेने स्वबळावर लढण्याचे ठरवले असून आघाडीसोबत फारकत घेऊन स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी यांच्यात अजून चर्चा सुरूच आहे. भाजप मात्र स्वबळावर लढत असल्याने ही निवडणूक रंगतदार होणार आहे. मागील निवडणुकीत सेना-भाजप वेगवेगळे लढले होते. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन पंचायत समितीची सत्ता मिळवली होती. त्या वेळीही शिवसेनेला दूर ठेवले होते. या वेळीही दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत असल्याने आघाडीबरोबर त्यांची टक्कर होणार असल्याचे दिसत आहे.
तालुक्या दोन खासदार तीन आमदार आहेत. एक खासदार शिवसेनेचा तर दुसरा भाजपचा. दोन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे तर एक शिवसेनेचा. त्यामुळे या खासदार-आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. दुसरीकडे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत घेऊन तिकीट दिले. तर पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट देऊ केल्याने शिवसैनिक दुखावले आहेत.