शिवसेना-भाजपमध्ये उमेदवार फोडण्याची स्पर्धा :

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 04:15 AM2019-08-01T04:15:48+5:302019-08-01T04:16:16+5:30

बविआसह काँग्रेस आघाडीचा युतीशी निकराचा संघर्ष

Shiv Sena-BJP contests to cast candidates in palghar | शिवसेना-भाजपमध्ये उमेदवार फोडण्याची स्पर्धा :

शिवसेना-भाजपमध्ये उमेदवार फोडण्याची स्पर्धा :

Next

डाव्यांसह श्रमजीवी संघटनेची भूमिकाही ठरणार महत्त्वाची

हितेन नाईक

पालघर : पालघरच्या राजकारणावर असलेले बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी शिवसेना, भाजपचे सुरू असलेले प्रयत्न आणि त्याला तोंड देण्यासाठी बविआ, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह डाव्यांची बांधली जाणारी मोट यामुळे येथील विधानसभेचा संघर्ष निकराचा होण्याची चिन्हे आहेत.

जिल्हा विभाजनानंतर गेल्यावेळी वर्चस्वासाठी प्रस्थापितांना मोठी धडपड करावी लागली. त्यातही हितेंद्र ठाकुर यांच्या बहुजन विकास आघाडीने तीन जागा जिंकल्या, तर भाजप दोन आणि शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले. गेल्या पाच वर्षांत येथे बरीच राजकीय उलथापालथ झाली. पोटनिवडणुका, लोकसभा, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांवेळी फोडाफोडीच्या राजकारणाचा पायंडा पाडला गेल्याने त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीआधी सेना-भाजप युती तुटल्याचा फायदा उठवत हितेंद्र ठाकूर यांनी वसई, नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघावर बहुजन विकास आघाडीचे (बविआ) वर्चस्व राखले. मात्र, यंदा युती असल्याने नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघात बविआला कडवी झुंज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्षितिज ठाकूर (नालासोपारा) आणि विलास तरे (बोईसर) या विद्यमान आमदारांना मतदारसंघात आत्तापासूनच तळ ठोकावा लागेल.

डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत हे भाजपतर्फे नालासोपाऱ्यातून लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांचेही नाव शिवसेनेतर्फे या मतदारसंघातून घेतले जात आहे. तसे झाले तर येथील उमेदवारीवरून युतीत चुरस होण्याची शक्यता आहे.

एकेकाळच्या शिवसेना आमदार व माजी राज्यमंत्री; परंतु सध्या बविआत असलेल्या मनीषा निमकर यांना बोईसरमधून तिकीट हवे आहे. तिकिट न मिळाल्यास त्यांनी शिवसेनेत जाण्याची तयारी केली आहे. मात्र, विद्यमान आमदार विलास तरे (बविआ) यांनाच पक्षात घेण्यासाठी शिवसेनेने गळ टाकला आहे. त्यामुळे निमकर यांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चे धोरण स्वीकारले आहे. विक्रमगडमधील विद्यमान भाजप आमदार विष्णू सवरा यांनी आजारी असल्याने आदिवासी विकास मंत्रीपद सोडले. ते स्वत: निवृत्ती घेऊन मुलगा डॉ. हेमंत सवरा यांना सक्रीय राजकारणात उतरविण्याच्या प्रयत्नात आहेत. मुलासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींना गळ घातली आहे. गेल्या निवडणुकीत सवरा यांना आव्हान देणारे सुनील भुसारा हेही भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामार्फत प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे भाजपची उमेदवारी कोणाला मिळते? याकडे लक्ष आहे. पालघरचे आमदार अमित घोडा यांच्याबाबत शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. पालघरच्या नगराध्यक्षा डॉ. काळे या इच्छा असूनही तांत्रिकतेमुळे शिवसेनेत प्रवेश करू शकत नाहीत. मात्र त्यांचे पती केदार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने येथील राजकीय चित्र गुंतागुंतीचे झाले आहे. वसई हा बविआचा बालेकिल्ला. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत वसईतही बविआचे मतदान घटले होते. त्यात लोकसभेची पोटनिवडणूक आणि मे मधील निवडणुकीत बविआला हादरा बसल्याने त्या पक्षाची आणि हितेंद्र ठाकूर यांची धाकधुक वाढली आहे. गेल्या विधानसभेला भाजपचे पास्कल धनारे यांनी मार्क्सवादी पार्टीकडून डहाणू मतदारसंघ हिसकावून घेतला. मात्र, लोकसभेला बविआच्या बळीराम जाधव यांना येथून सर्वाधिक मतदान झाल्यामुळे भाजपला तेथील व्यूहरचना बदलावी लागेल. विवेक पंडित यांनी लोकसभेवेळी आधी भाजप आणि नंतर शिवसेनेला श्रमजीवी संघटनेमार्फत साथ दिली. त्यांनाही विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यांना कोठे सामावून घेतले जाते, तेही महत्त्वाचे आहे.

शिवसेना-भाजपत होणारे प्रवेश, विद्यमान आमदारांना फोडण्याची त्यांच्यातील स्पर्धा यात कोण बाजी मारेल, त्याची युतीत सरशी होईल. युती जेवढी बळकट होईल, तेवढी बविआसाठी ती धोक्याची घंटा ठरेल. त्याचबरोबर बविआला लोकसभेवेळी पाठिंबा देणारे काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप आदी पक्षांची भूमिकाही कळीची ठरेल.

गेल्या निवडणुकीत दुसºया क्रमांकावरील उमेदवार : शिवसेना २, भाजप १, अपक्ष १

सध्याचे पक्षीय बलाबल : एकूण जागा ६ : बविआ ३, भाजप २, शिवसेना १

सर्वात मोठा विजय
नालासोपारा : क्षितिज ठाकूर (बविआ) मते - १,१३,५६६
(पराभव : राजन नाईक, भाजप)

सर्वात कमी
मताधिक्याने पराभव
विक्रमगड : प्रकाश निकम - (शिवसेना) ३८४५
(विजयी : विष्णू सवरा - भाजप)

Web Title: Shiv Sena-BJP contests to cast candidates in palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.