इंधन दरवाढीचा शिवसेनेकडून निषेध, पालघरमधील विविध तालुक्यांत आंदाेलने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 03:34 AM2021-02-06T03:34:12+5:302021-02-06T03:34:36+5:30
petrol Price hike : : दिवसागणिक मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ होत आहे. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे दर वाढवून सामान्य माणसाचे कंबरडे मोडणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी वसईत शिवसैनिक रस्त्यावर उतरले.
नालासोपारा : दिवसागणिक मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ होत आहे. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे दर वाढवून सामान्य माणसाचे कंबरडे मोडणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी वसईत शिवसैनिक रस्त्यावर उतरले. केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेने वसईच्या तहसील कार्यालय येथे आंदोलन केले. केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली.
पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्यावतीने वसईमध्ये पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
कोरोना काळापासून अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करण्याऐवजी विविध प्रकारे दरवाढ केली जात आहे. सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारचा धिक्कार करतोय , असे सांगण्यात आले. केंद्र सरकारने सामान्यांच्या खिशावर टाकलेला हा दरोडा आहे.केंद्र सरकारची तिजोरी भरण्यासाठी ही दरवाढ केली असल्याचे जनतेचे मत आहे, असे शिवसेना कार्यकर्त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधातील विविध प्रकारचे फलक हातात घेऊन सरकारचा निषेध केला. तसेच घोषणाबाजी करण्यात आली. सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी, असे शिवसैनिकांनी सांगितले. आंदोलनाप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, प्रवीण म्हाप्रळकर, नवीन दुबे, पंकज देशमुख, निलेश तेंडुलकर, जितू शिंदे, मिलिंद खानोलकर, संतोष टेंबवलकर तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनात महिला शिवसैनिकही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
‘इंधन दरवाढ कमी करा’
विक्रमगड : केंद्र सरकार पेट्रोल व डिझेलमध्ये दिवसागणिक दरवाढ करत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे. पेट्रोल १०० रुपयांचा टप्पा पार करण्याची शक्यता असून, डिझेल दरवाढही सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे गणित बिघडले आहे. ही दरवाढ कमी करण्यासाठी शुक्रवारी शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयासमाेर आंदाेलन करून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैष्णवी रहाणे, पंचायत समिती उपसभापती नम्रता गोवारी, पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश पागी, संजय अगिवले, रवींद्र भोईर, योगेश भानुशाली, प्रशील प्रजापती व पदाधिकारी उपस्थित होते.
वाड्यात शिवसैनिक उतरले रस्त्यावर
वाडा : केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीविरोधात वाडा तालुका शिवसेनेतर्फे शुक्रवारी वाडा तहसीलदार कार्यालयासमोर निषेध आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
देशभरात भडकणाऱ्या महागाईतून सामान्य नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शिवसेना त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहून इंधन दरवाढ केंद्र सरकारने मागे घ्यावी यासाठी रस्त्यावर उतरली आहे. नागरिकांना दिलासा मिळेपर्यंत हे आंदाेलन सुरू ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.
या वेळी उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख उमेश पठारे, पंचायत समितीचे सभापती योगेश गवा, उपनगराध्यक्षा वर्षा गोळे, जिल्हा परिषद सदस्य राजेश मुकणे, संपर्कप्रमुख धनंजय पष्टे, पंचायत समिती सदस्य अमोल पाटील, राजेश सातवी, अस्मिता लहांगे, तालुका समन्वयक प्रकाश केणे, तालुका सचिव नीलेश पाटील, शहरप्रमुख प्रमोद घोलप, उपजिल्हा संघटक
संगीता ठाकरे, तालुका संघटक रेश्मा पाटील, विधानसभा संघटक मनाली फोडसे, माजी तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, युवासेनेचे उपजिल्हा युवा अधिकारी सचिन पाटील, उपतालुकाप्रमुख भावेश पष्टे, भरत हजारे, दीपक मोकाशी, विशाल गावळे आदी उपस्थित होते.