शिवसेना विधिमंडळात व संसदेत बुलेट ट्रेनच्या विरोधात आवाज उठवेल- आ. डॉ.नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 08:13 PM2018-06-03T20:13:13+5:302018-06-03T20:16:44+5:30
पालघर येथील लायन्स क्लब मैदानावर आज कष्टकरी संघटना, भूमी अधिकार आंदोलन, महाराष्ट्र राज्य किसान सभा, गुजरात खेडूत समाज, पर्यावरण सुरक्षा समिती आणि शेतकरी संघर्ष समिती या सगळ्या संघटनांनी एकत्र येत ०३ जून, २०१८ रोजी सर्वपक्षीय बुलेट ट्रेन विरोधी कार्यक्रम आयोजित केला होता.
पालघर- पालघर येथील लायन्स क्लब मैदानावर आज कष्टकरी संघटना, भूमी अधिकार आंदोलन, महाराष्ट्र राज्य किसान सभा, गुजरात खेडूत समाज, पर्यावरण सुरक्षा समिती आणि शेतकरी संघर्ष समिती या सगळ्या संघटनांनी एकत्र येत ०३ जून, २०१८ रोजी सर्वपक्षीय बुलेट ट्रेन विरोधी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित होते.
यावेळी या कार्यक्रमात शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षाची भूमिका मांडताना बुलेट ट्रेनला शिवसेनेचा विरोध आहे आणि भविष्यात राहील असे स्पष्ट करतांना सांगितले की, १८ मे, २०१८ रोजी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत कृती समितीचे सदस्य रमाकांत पाटील, ब्रायन लोबो आणि उल्का महाजन यांच्या बैठक झाली होती.
या बैठकीत पक्षप्रमुख यांनी शिवसेनेचा पाठिंबा या बुलेट ट्रेन विरोधी जनतेच्या आंदोलनाली असेल, असे त्यावेळीच जाहीर केले होते. त्यामुळे शिवसेना बुलेट ट्रेन आणि महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्राची 398 हेक्टर जमीन पालघर जिल्हातील 221.38 हेक्टर जमिन कशी वाया जाणार आहे ह्याची आकडेवारी आ.डॉ.गोऱ्हे यांनी सादर केली. पालघरमध्ये बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा रेल्वेची स्थिती सुधारा, दिखाव्यासाठी विकास न करता मानवी चेह-याच्या विकासाला महत्त्व द्या, असे त्यावेळी सरकारला सूचना केली.
बुलेट ट्रेनने बाधित असलेली जी 70 गावे आहेत. या गावांमध्ये ग्रामसभेचे ठराव संमत झालेत, त्यांनी ते ठराव कृती समितीच्या माध्यमातून आमच्याकडे द्या .यासाठी गावोगाव संघर्ष यात्रा करून ते ठराव आम्ही स्वीकारू व आम्ही ते ठराव विधान परिषद, विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहामध्ये शिवसेनेकडून जनतेची भूमिका ठामपणे मांडू असे सांगितले. त्यांच्यावर चर्चा करत सरकारला बुलेटट्रेन रद्द करायला भाग पाडू असे सांगत प्रत्येक ठोस कृतीलाच सुरुवात केली. या कार्यक्रमामध्ये आ. रवींद्र फाटक, आ. अमित घोडा, श्रीनिवास वनगा, कॉम्रेड अशोक ढवळे, गुजरात खेडूत समाजाचे अरुण मेहता, उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही आपल्या पक्षाची भूमिका मांडली तसेच काँग्रेसचे पांडुरंग काळे यांनी त्यांच्या पक्षाच्या भूमिका मांडल्या बुलेट ट्रेन विरोधी कृती समितीच्या रमाकांत पाटील, ब्रायन लोबो आणि उल्का महाजन यांनीही बुलेट ट्रेन बद्दलची त्यांची भूमिका मांडली.