पालघरच्या नगराध्यक्षा शिवसेनेत प्रवेश करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 10:54 PM2019-07-08T22:54:45+5:302019-07-08T22:56:10+5:30
खासदार गावितांचा जाहीर गौप्यस्फोट : मॅडमचे मात्र व्यासपीठावरून सूचक मौन
हितेंन नाईक।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा डॉ.उज्वला काळे लवकरच शिवसेनेत प्रवेश घेऊन हाताला शिवबंधन बांधणार असल्याचा गौप्यस्फोट खासदार राजेंद्र गावितांनी एका कार्यक्रमादरम्यान केला.
या जाहीर वक्तव्याचा नगराध्यक्षांनी व्यासपीठावरून इन्कार न केल्याने त्यांची याला मूक संमती असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पालघर नगरपरिषदेच्या मार्चमध्ये झालेल्या २१ जागांच्या निवडणुकीत जागा वाटपात प्रथमच शिवसेनेवर भाजपासाठी २९ पैकी ९ जागा सोडण्याची पाळी आली. आतापर्यंतच्या झालेल्या निवडणुकीत १ ते २ जागेपेक्षा अधिक जागा भाजपला सोडण्यास स्थानिक शिवसेना उत्सुक नसतांना एकनाथ शिंदेंनी भाजपला ९ जागा देत स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निर्णय क्षमतेला प्रथमच छेद दिला. त्यामुळे उरलेल्या २० जागापेक्षा इच्छुक उमेदवारांची यादीतील नावांची रांग मोठी झाली होती. अनेक वर्षांपासून पक्षवाढीसाठी आपले आयुष्य पणाला लावलेल्या कट्टर शिवसैनिकांच्या नगरसेवक होण्याच्या इच्छेला शिंदेंनी बाहेरून पक्षप्रवेश घेतलेल्याना उमेदवारी जाहीर करून मूठमाती दिली.
त्यामुळे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व नगराध्यक्ष उत्तम पिंपळेसह अन्य काही आजी-माजी नगरसेवकांनी मंत्री शिंदेंच्या विरोधात बंड करून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर दुसरीकडे नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेत अनेक वर्षे पक्षासाठी निस्वार्थीपणे काम करणाºया महिला उमेदवार असताना राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश घेणाºया डॉ.श्वेता पाटील यांना नगराध्यक्षपदाचे तिकीट देण्याची मोठी घोडचूक केली होती. या निर्णयाने स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिकामध्ये मोठी नाराजी पसरली होती. बंडखोरी करीत उभ्या राहिलेल्या शिवसैनिक उमेदवारांचा मतदार संघातील दांडगा जनसंपर्क पाहता त्यांची नाराजी आपल्याला सत्तेपासून रोखू शकते याची स्पष्ट कल्पना उशिराने का होईना शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना आल्यानंतर पालघर शहरात ‘रात्रीस खेळ चाले’ प्रमाणे रात्रीची गणिते खेळली जाऊ लागली. परंतु झालेल्या निवडणुकीत चार बंडखोर शिवसैनिक जिंकून आले. या निवडणुकीत सेनेने १५ तर सहकारी भाजप ने ९ जागा जिंकून बहुमत जरी मिळविले असले तरी नगराध्यक्षपदाची माळ मात्र मतदारांनी काँग्रेसच्या डॉ.उज्वला काळेच्या गळ्यात घातली.
नगराध्यक्षपद हातातून गेल्याने मंत्री शिंदेंनी घेतलेले निर्णय हे चुकीचे असल्याचे मतदार व शिवसैनिकांनी दाखवून दिले होते. त्यामुळे ही चूक सुधरविण्यासाठी नगराध्यक्ष डॉ.काळे यांनी शिवसेनेत यावे, असे प्रयत्न अनेक महिन्यापासून सुरू होते. मात्र मला पालघरवासीय मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून मोठ्या विश्वासाने निवडून दिल्याने मी त्यांचा विश्वासघात करणार नाही. मी काँग्रेसमध्येच राहणार असे त्यांनी पत्रकारांना सांगितले होते.
सोपस्कारांची पूर्तता
मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने डॉ.काळे या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या बातम्यांना रविवारी खासदार गावितांनी व्यासपीठावरून केलेल्या वक्तव्यानी बळकटी मिळत आहे. काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता केल्यानंतर त्यांच्या प्रवेशाचे सोपस्कार पूर्ण होतील अशी माहिती पुढे येत आहे. आता त्याप्रमाणे घडते कधी याकडे लक्ष लागले आहे.