शिवसेनेची भाजपवर कुरघोडी, कुडूसमध्ये तिन्ही जागांवर विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:41 AM2020-01-11T00:41:04+5:302020-01-11T00:41:07+5:30
वाडा तालुक्यातील कुडूस गट हा अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जातो.
वाडा : वाडा तालुक्यातील कुडूस गट हा अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जातो. यावेळी हा गट अनुसूचित जमातींसाठी राखीव झाल्याने तेवढी चुरस नव्हती. गेल्या निवडणुकीत या गटातील तीनही जागांवर भाजपने यश मिळवले होते. या निवडणुकीत मात्र, शिवसेनेने भाजपकडून हा गट आणि दोन्ही गण हिसकावून घेतले असून या गट तसेच गणात मोठ्या मताधिक्याने सेना उमेदवार निवडून आले आहेत.
कुडूस गटातून शिवसेनेचे राजेश मुकणे हे २ हजार १७५ मतांनी विजयी झाले असून भाजपचे स्वप्नील जाधव यांचा त्यांनी पराभव केला आहे. कुडूस गणातही शिवसेनेच्या अस्मिता लहांगे आणि चिंचघर गणातून राजेश सातवी हे दोन्ही उमेदवार एक हजार मतांच्या फरकाने निवडून आले आहेत.
कुडूस गटातील भाजपचे कार्यकर्ते मंगेश पाटील व भगवान चौधरी यांच्या सूनबाई धनश्री चौधरी हे अनुक्रमे पालसई तसेच आबिटघर या जिल्हा परिषद गटातून उभे होते. त्यामुळे या दोन्ही कार्यकर्त्यांचे हितचिंतक हे त्या - त्या गटात प्रचारासाठी गेल्याने त्यांना कुडूस गट - गण तसेच चिंचघर गणात प्रचार करता आला. त्यामुळे भाजपला येथे या दोन्ही कार्यकर्त्यांमुळे फटका बसल्याची चर्चा आहे.
भाजपच्या कुडूस गट - गण तसेच चिंचघर गणाची जबाबदारी ज्येष्ठ कार्यकर्ते कुंदन पाटील, माजी उपसभापती जगन्नाथ पाटील, अशोक जाधव, भालचंद्र कासार, जयेश शेलार, भरत जाधव, अंकिता दुबेले, दिनेश पाटील यांच्यावर होती. पण, ही जागा शिवसेनेकडेच गेली.
उलट कुडूस गटात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची प्रचंड फौज आहे. गावागावात त्यांचे कार्यकर्ते आहेत. आणि या कार्यकर्त्यांनी जोरदार लढा देत शिवसेनेला विजयापर्यंत नेले. शिवसेनेच्या कुणबी आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, उपजिल्हाप्रमुख सुनिल पाटील, युवा कार्यकर्ते सचिन पाटील, प्रा.धनंजय पष्टे, निलेश पाटील, सुधीर
पाटील, जनार्दन भेरे, दिपक पाटील, प्रकाश पाटील, भावेश पष्टे, मिलिंद चौधरी, विशाल गावले, पराग
पाटील अशा अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवाराचा झंझावाती प्रचार
केला आणि उमेदवारांना निवडून आणले.
राज्यात सेनेची सत्ता असल्याने या गटातही सेनेचा उमेदवार निवडून आल्यास या भागाचा विकास होईल, असे मतदारांना वाटले आणि काही प्रमाणात मतदारांनी शिवसेनेला कौल दिल्याचे हेही एक कारण आहे.
>काँग्रेसच्या पदरी मात्र अपयश
कुडूस गटातून काँग्रेसने देखील दामोदर डोंगरे यांना उमेदवारी दिली होती. त्यांना कुडूस, नारे व वडवली या गावातील मुस्लिम मतदार बहुमताने मतदान करतील अशी आशा आघाडीच्या कार्यकर्त्यांना होती. त्यामानाने मतदान न झाल्याने त्यांना यश गाठता आले नाही. त्याचा फायदा शिवसेनेला झाला. आघाडीचे कार्यकर्ते इरफान सुसे, मुस्तफा मेमन, डॉ. गिरीश चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहिदास पाटील, अल्लारख मेमन, नुमान पाटील यांचे प्रयत्न याही वेळी अपयशी ठरले.