पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 08:55 PM2020-12-12T20:55:01+5:302020-12-12T20:55:39+5:30
Mira Road : भाईंदरच्या जुन्या पेट्रोल पंप बाहेर शिवसेनेच्यावतीने केंद्रातील भाजपा सरकारचा घोषणा देत निषेध केला .
मीरारोड : मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेने पेट्रोल , डिझेल व गॅसची दरवाढ सतत करून नागरिकांची लूट व महागाईचा आगडोंब निर्माण करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करत निदर्शने केली.
भाईंदरच्या जुन्या पेट्रोल पंप बाहेर शिवसेनेच्यावतीने केंद्रातील भाजपा सरकारचा घोषणा देत निषेध केला . जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला जिल्हा संघटक स्नेहल सावंत , उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक राजू भोईर, सह पदाधिकारी सुप्रिया घोसाळकर, वादळी परळकर, श्रेया साळवी, शहर प्रमुख लक्ष्मण जंगम, विकास पाटील, जयराम मेसे, पप्पू भिसे, सलमान हाश्मी, सॅबी फर्नांडिस आदी आंदोलनास उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती एकीकडे गेल्या अनेक वर्षां पासून कमी झालेल्या असताना केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे भाजप सरकार मात्र पेट्रोल , डिझेल चे दर सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढवत जनतेला लुटत आहे. जनतेची लूट आणि दुसरीकडे दरवाढीमुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे, अशी टीका गटनेत्या नीलम ढवण यांनी केली आहे.
कोरोना महामारी मुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात असताना सुद्धा भाजपा सरकार मात्र सतत पेट्रोल-डिझेल दर वाढ करून नागरिकांची पिळवणूक करत असल्याचे शहर संघटक वेदाली परळकर म्हणाल्या.