भाजपाच्या खेळीने शिवसेनेचा विश्वासघात , पाठीत खंजीर नाही तर एके ४७ खुपसली : अनंत तरेंचे शरसंधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 05:44 AM2017-09-12T05:44:07+5:302017-09-12T05:44:24+5:30
हितेन नाईक
पालघर : जिल्हा परिषद समिती सभापतींच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत नेहमी प्रमाणे भाजपने आपले वर्चस्व राखले तर राष्ट्रवादीचे दामोदर पाटील ह्यांना बहुजन विकास आघाडी सह भाजपने अचानक पाठिंबा दर्शविल्याने शिवसेनेच्या घनश्याम मोरे ह्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भाजपने सेनेच्या पाठीत खंजीर नाही तर एके ४७ खुपसल्याची प्रतिक्रि या संपर्क प्रमुख अनंत तरे ह्यांनी दिल्याने जिल्ह्यातील युती संपुष्टात आल्याचे मानले जात आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या उर्विरत अडीच वर्षासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी भाजपचे विजय खरपडे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे निलेश गंधे ह्यांची बिनविरोध निवड झाली होती. उपाध्यक्षपदासाठी सेनेच्या प्रकाश निकमला भाजपने विरोध दर्शवल्याने ऐनवेळी निकम यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते.
जिल्हा परिषदेत भाजपचे २१ सदस्य, शिवसेनेचे १५ , बहुजन विकास आघाडी चे १०, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ५, राष्ट्रवादी ४, काँग्रेस १ आणि अपक्ष १ असे ५७ सदस्य निवडून आले होते.
जिल्हा परिषदेच्या १४ आॅगस्ट रोजी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकी नंतर उर्विरत विशेष समिती सभापतीच्या निवडीसाठी भाजपचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, बाबजी काठोले, जिल्हाध्यक्ष आ. पास्कल धनारें सह सेनेचे संपर्क मंत्री अनंत तरे, जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, शिरीष चव्हाण, माजी उपाध्यक्ष सचिन पाटील ह्यांच्या चार बैठका पार पडल्या होत्या. त्यात भाजपच्या कोट्यातील एक सभापती पद सेनेला देण्याबाबत एकमताने ठरल्याचे अनंत तरेंनी सांगितले होते.
प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रि येला सुरु वात केल्यानंतर प्रथम महिला बालकल्याण व समाज कल्याण विभागाच्या सभापती पदासाठी एकेकच अर्ज आल्याने वाडा गटातून निवडून आलेल्या भाजपच्या धनश्री चौधरी ह्यांची बालकल्याण तर आलोंडे गटातून निवडून आलेल्या दर्शना दुमाडा ह्यांची समाज कल्याण सभापती पदी बिनविरोध निवड झाली. तर कृषी व पशुसंवर्धन आणि बांधकाम-आरोग्य पदाच्या सभापती पदा साठी सेनेकडून घनश्याम मोरे व राष्ट्रवादीचे दामोदर पाटील ह्यांनी अर्ज भरले असताना भाजप ने एक सभापती पद सेनेला देण्याचे मान्य केले असताना अचानक भाजपच्या माजी सभापती अशोक वडे ह्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत सेनेला धक्का दिला.
दोन सभापती पदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी गजरे ह्यांनी घेतलेल्या निवडणुकीत अशोक वडे ह्यांना ३३ मते,तर राष्ट्रवादीच्या दामोदर पाटलांना भाजप व बहुजन विकास आघाडीने पाठिंबा दर्शविल्याने त्यांना ३३ मते तर सेनेच्या घनश्याम मोरे ह्यांना अवघी १६ मते पडली.
ह्यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे व राष्ट्रवादीचे मिळून ९ सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला नाही. तर काँग्रेसच्या एक सदस्यानेही राष्ट्रवादी-बहुजन-भाजप आघाडीच्या उमेदवाराला आपले मत दिल्याने जिल्ह्यात नवीन समिकरणाने जन्म घेतल्याचे दिसून आले.
कारणे दाखवा
जिल्हापरिषदेत भाजप, शिवसेना व बहुजन विकास आघाडी या तिन्ही पक्षाशी राष्ट्रवादी पक्षाशी कोणतीही आघाडी नव्हती. राष्ट्रवादीचे दामोदर पाटील ह्यांना बहुजनच्या कोट्यातून सभापती पद मिळाल्याने पक्ष्याच्या भूमिके विरोधात त्यांनी हे पद कसे स्वीकारले ह्या बाबत त्यांना करणे दाखवा नोटीस पाठविण्यात येऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.
- सुनील भुसारा,
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष