दहा शिवप्रेमींकडून गडाची स्वच्छता, अशीही शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 04:31 AM2019-02-20T04:31:19+5:302019-02-20T04:31:44+5:30
अशेरीगडाचा २८१ वा विजयदिन : प्लास्टिकचा कचरा, दारुच्या बाटल्यांचा खच
वसई : किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत जिल्ह्यातील अशेरीगडावर २८१ व्या अशेरीगड विजयदिनाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. मुख्य गडाच्या सदरेवर मानवंदना, अशेरीदेवी तांदळा संवर्धन, गडावरील प्लास्टिक कचरा व दारूच्या बाटल्या स्वच्छता मोहीम हे असे विविध उपक्र म दुर्गमित्रांकडून राबविण्यात आले.
किल्ले वसई मोहिमेच्या एकूण १० प्रतिनिधींनी अशेरीगडावरील मुख्य सदरेवर पूजन करून तेथे भगवा जरिपटका फडकवून मानवंदना दिली. यावेळी ज्ञात-अज्ञात वीरांच्या स्मरणार्थ तसेच, पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यातील भारतीय जवानांच्या स्मृतींना वंदन करण्यात आले. किल्ले वसई मोहिमेचे इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी उपस्थितांना अशेरीगडाचा प्राचीन इतिहास व संवर्धनाची गरज यावर मार्गदर्शन केले. यावेळी दुर्गमित्रांनी गडाच्या प्राचीन गुंफा परिसरातील प्लास्टिक कचरा व दारूच्या बाटल्या एकत्रित गोळा केल्या. अशेरीगड जिल्हा पालघर खोडकोना गाव मनोर प्रांत येथील श्री आदिशक्ती गडदेवता अशेरीदेवीच्या मूळ तांदळा स्वरूप स्थळाची गेल्या कित्येक वर्षांपासून नैसिर्गकरीत्या झीज झालेली होती. तसेच स्थानिक भाविकांनी त्यावर पूजनासाठी वापरलेल्या हळद, कुंकू, अगरबत्तीचा धूर, जुने हार यामुळे मूळ तांदळा बऱ्यापैकी धूसर झालेला होता. दुर्गमित्रांनी नैसिर्गक साहित्यांचा वापर करून देवीचा मूळ तांदळा सुशोभित केला. यावेळी कोळसा काजळी, नारळाच्या शेंडीचा भुसा, तेल, सेंदूर यांच्या संमिश्र उपायातून तांदळा मूळ स्वरूपात नीट केला. यावेळी देवीच्या तांदळ्यास कानफुले, मंगळसूत्र यांनी सुशोभित करण्यात आले. यावेळी दुर्गमित्र मनोज पाटील यांनी देवीला घंटा अर्पण केली.
किल्ले वसई मोहीमे अंतर्गत २००७ सालापासून सुरू असणारी अशेरीगड विजयदिनाची परंपरा अविरत सुरू आहे. दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्र मांनी गडाचे एकएक इतिहास कण जपण्यासाठी दुर्गमित्र प्रयत्नशील आहेत.
- डॉ. श्रीदत्त राऊत, किल्ले वसई मोहिम इतिहास अभ्यासक
सातत्यपूर्ण श्रमदान मोहिमा व विजयदिन परंपरेच्या माध्यमातून अशेरीगड संवर्धनासाठी किल्ले वसई मोहीम परिवार प्रयत्नशील राहील.
- आकाश जाधव, किल्ले वसई मोहिम (दुर्गमित्र)