प्रचार शिगेला : वसई काँग्रेसमध्ये दुफळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:35 PM2017-09-24T23:35:00+5:302017-09-24T23:35:15+5:30
तरखड ग्रामपंचायत निवडणुकीतील आपलेच उमेदवार अधिकृत असल्याचा दावा दोन्ही गटाकडून करण्यात आल्याने वसई तालुक्यातील काँग्रेसमधील दुही चव्हाट्यावर आली आहे.
शशी करपे
वसई : तरखड ग्रामपंचायत निवडणुकीतील आपलेच उमेदवार अधिकृत असल्याचा दावा दोन्ही गटाकडून करण्यात आल्याने वसई तालुक्यातील काँग्रेसमधील दुही चव्हाट्यावर आली आहे. दोन्ही गटाकडून आपापल्या उमेदवारांचा प्रचारही सुरु करण्यात आला आहे.
तरखड-आक्टण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी जिल्हा सचिव बिपीन कुटीन्हो यांनी जनआंदोलन समिती आणि शिवसेनेशी आघाडी करीत उमेदवार मैदानात उतरवले आहेत. तर वसई तालुका (ग्रामीण) काँग्रेसचे अध्यक्ष राम पाटील यांनीही उमेदवार मैदानात उतरवले आहेत. दोन्ही गटाकडून आपलेच उमेदवार अधिकृत असल्याचा दावा करून आपापल्या उमेदवारांचा प्रचार सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे वसईत काँग्रेसमध्ये असलेली दुही चव्हाट्यावर आली आहे.
बिपीन कुटीन्हो यांचेच पॅनल अधिकृत असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील आणि दत्ता नर यांनी केला आहे. कुटीन्हो यांना उमेदवार निवडण्याचे अधिकार देण्यात आले होते. तसेच काँग्रेसने जनआंदोलन समिती आणि शिवसेनेशी आघाडी केली आहे. कुटीन्हो यांचेच पॅनल अधिकृत असल्याचे माहिती प्रदेश सचिव विजय पाटील यांनी दिली. आमचेच पॅनल अधिकृत असून आमचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे, असे कुटीन्हो यांनी सांगितले. पाटील आणि नर यांनी कुटीन्हो यांची बाजू घेत प्रचारात भाग घेण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेसचे ग्रामीणचे अध्यक्ष राम पाटील यांनी आपलेच पॅनल अधिकृत असून त्याला पक्षाची मान्यता असल्याचा दावा केला आहे. कुटीन्हो यांनी आम्हाला विश्वासात न घेता परस्पर उमेदवार उभे केले आहेत. त्यांना काँग्रेसची मान्यता नाही, असे पाटील यांनी सांगितले. तर तरखड ग्रामपंचायत निवडणुकीत तालुका अध्यक्ष राम पाटील यांचेच पॅनल अधिकृत असल्याची माहिती पालघर जिल्ह्याचे (ग्रामीण) अध्यक्ष केदार काळे यांनी दिली. पाटील यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वसई विरार शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉमणिक डिमेलो मैदानात उतरले आहेत. दरम्यान, काँग्रेसचे दोन पॅनल आणि त्यासाठी दोन्ही गटाकडून
वसई विरार शहरातील नेते प्रचार करू लागले आहेत. त्यामुळे अधिकृत उमेदवार नक्की कोण याबद्दल मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला आहे.