दापोली ग्रामपंचायतीसाठी भाजपावर सेनेचे ‘शिवबंधन’
By admin | Published: June 17, 2017 01:04 AM2017-06-17T01:04:01+5:302017-06-17T01:04:01+5:30
दापोली ग्रामपंचयातीवरील सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेना-भाजपामध्ये सुरु असलेल्या लढाईत सध्यातरी सेनेने बाजी मारली आहे. सरपंच मनस्वी संखे ह्यांच्या
- लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : दापोली ग्रामपंचयातीवरील सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेना-भाजपामध्ये सुरु असलेल्या लढाईत सध्यातरी सेनेने बाजी मारली आहे. सरपंच मनस्वी संखे ह्यांच्या हाताला जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांनी शिवबंधन बांधून ग्रामपंचायतींवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळविल्याचा दावा केला असला तरी सेना-भाजपच्या सरपंचाच्या पळवा-पळवीची खमंग चर्चा तालुक्यात सुरु आहे.
पालघर तालुक्यात मे महिन्यात २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्या नंतर अनेक ग्रामपंचायतींवर आपली सत्ता आल्याचा दावा अनेक पक्ष प्रमुखांनी केला होता. पालघर जवळील दापोली ग्रामपंचायत मध्ये एकूण ७ जागांपैकी बहुमत आपल्याकडे असल्याचा दावा शिवसेना-भाजप करीत होते. मात्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवाराकडे पक्षाचा एबी फॉर्म अथवा निवडणूक चिन्ह नसल्याने अनेक पक्ष उमेदवारांवर आपला दावा करीत होते. त्यामुळे दापोली ग्रामपंचायतीच्या सरपंच मनस्वी संखे ह्या शिवसेनेच्या असल्याचा दावा सेनेने केल्या नंतर भाजपच्या जेष्ठ पदाधिकारी अर्चना वाणी, जिप सभापती अशोक वडे, विजय तामोरे ई. पदाधिकाऱ्यांनी दापोली येथे धाव घेत सरपंच मनस्वी संखे ह्या आपल्या भाजप पक्षाच्या असल्याचा दावा करीत भाजप पक्षाचे झेंडे सरपंच संखे ह्यांच्या हाती देऊन फोटो सोशल मीडिया टाकून खळबळ उडवली होती.
१६ ग्रामपंचायतींवर सत्तेचा दावा : त्या नंतर चिडलेल्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पालघरच्या ठाणे जिल्हा समाज संघ सभागृहात ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी दापोलीचे सुपुत्र वैभव संखे, जिल्हाध्यक्ष उत्तम पिंपळे ह्यांच्या प्रयत्ना नंतर आमदार अमित घोडा, जिप उपाध्यक्ष सचिन पाटील, सभापती रवींद्र पागधरे, सुधीर तामोरे, परीक्षित पाटील, उपसरपंच हेमंत संखे आदींच्या उपस्थितीत दापोलीच्या सरपंच मनस्वी संखे ह्यांच्या हाताला जिल्हाध्यक्षानी शिवबंधन बांधल्याने दापोलीच्या ग्रामपंचायतींवर आता सत्ता कोणाची ह्या दावा-प्रतिदाव्याला पूर्ण विराम मिळाला आहे. तर तालुक्यातील २६ पैकी १६ ग्रामपंचायतींवर सेनेची सत्ता असल्याचा दावा केला आहे.