बाळासाहेबांचा बॅनरवरील फोटो फाडल्याचा ठपका; पालघर जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 09:35 AM2022-07-12T09:35:02+5:302022-07-12T09:41:59+5:30

पालघर आणि ठाणे येथील कुठल्याही निर्णयात मुंबईमधील शिवसेना नेत्यांचा हस्तक्षेप एकनाथ शिंदे खपवून घेत नसल्याने राजेश शहा वरील हकालपट्टीची कारवाई होत नव्हती. 

Shivsena Uddhav thackeray order to Expulsion of Palghar district chief Rajesh Shah | बाळासाहेबांचा बॅनरवरील फोटो फाडल्याचा ठपका; पालघर जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी

बाळासाहेबांचा बॅनरवरील फोटो फाडल्याचा ठपका; पालघर जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी

googlenewsNext

हितेन नाईक

पालघर:- पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवीत पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक आणि पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा ह्यांची पदावरून हकालपट्टी केल्याची घोषणा शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून करण्यात आली आहे.

शिवसेनेतून बंडखोरी करून एकनाथ शिंदे प्रथम सुरत येथे गेल्या नंतर शिंदे ह्यांच्याशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे ह्यांनी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक ह्यांना सोबत पाठवीत त्याच्यावर विश्वास दाखविला होता.ही चर्चा अयशस्वी झाल्या नंतर रवींद्र फाटक ह्यांनी शिवसेनेसोबत राहण्याऐवजी गुवाहाटी येथे जाऊन एकनाथ शिंदे ह्यांच्याशी हातमिळवणी केली होती. तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत वणई गट शिवसेनेकडे होता. मात्र पोटनिवडणुकीत ह्या गटात उमेदवार बदलून खासदार राजेंद्र गावित ह्याच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या एका गटाने  भाजपच्या विरोधी उमेदवाराला मदत केली असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रोहित गावित ह्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.

दुसरीकडे पालघर पूर्व येथील एका कंपनीत युनियन स्थापन करण्याच्या वादातून निर्माण झालेल्या तणावादरम्यान बाळासाहेब ठाकरे ह्यांचा बॅनर वरील फोटो फाडून त्याची विटंबना करण्यात आली होती. इतकी मोठी घटना घडली असताना जिल्हाप्रमुख राजेश शहा ह्यांनी गप्प बसण्याच्या विरोधात जिल्ह्यातील शिवसैनिका मधून संतप्त भूमिका उमटत होत्या. त्या घटने विरोधात बोईसर आणि पालघर मधील शिवसैनिकांनी विधानसभा क्षेत्र प्रमुख वैभव संखे ह्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून दोषी विरोधात गुन्हे नोंद करण्याची मागणी केली होती. बाळासाहेबांचे बॅनर फाडण्याच्या हालचाली ह्या पालघर शहरातून झाल्याच्या तक्रारीनंतर  शिवसेनेमध्ये सक्रिय असलेल्या दोन आरोपी विरोधात पालघर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. दुसरीकडे जिल्हा प्रमुख शहा आणि त्याचे भाऊ ह्यांनी काही ठराविक लोकांना हाताशी धरून पालघर बिडको औद्योगिक वसाहत,कोळगाव,वेऊर,नंडोरे येथील कारखान्यातील कन्स्ट्रक्शन,लेबर कॉन्ट्रॅक्ट,भंगार चे जबरदस्तीने ठेके घेतल्याने उद्भवलेल्या बाचाबाची दरम्यान वडराई-माहीम येथील काही शिवसैनिकांनी राजेश शहा ह्यांच्या भावाला मारहाण करण्याचा प्रकार घडला होता.त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांनी वरिष्ठ पातळीवर राजेश शहा विरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या.परंतु एकनाथ शिंदे,रवींद्र फाटक ह्यांचा वरदहस्त राजेश शहावर असल्याने त्यांच्याविरोधात कुठलीही कारवाई मातोश्री वरून केली जात न्हवती.

पालघर आणि ठाणे येथील कुठल्याही निर्णयात मुंबईमधील शिवसेना नेत्यांचा हस्तक्षेप एकनाथ शिंदे खपवून घेत नसल्याने राजेश शहा वरील हकालपट्टीची कारवाई होत नव्हती. आता पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवीत संपर्क प्रमुख रवींद्र फाटक आणि जिल्हा प्रमुख राजेश शहा ह्यांची हकालपट्टी करण्याची घोषणा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून करण्यात आली आहे.त्यामुळे पालघर जिल्ह्याला नवीन संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख मिळणार आहे.

Web Title: Shivsena Uddhav thackeray order to Expulsion of Palghar district chief Rajesh Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.