तुनीषाच्या आयुष्यात अली असल्याचा शिजानचा दावा; धोकादायक औषधे घेत असल्याचा युक्तिवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 06:50 AM2023-01-10T06:50:27+5:302023-01-10T06:52:17+5:30
जामिनावर उद्या सुनावणी
नालासोपारा : शिजानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तुनीषा शर्माच्या आयुष्यात अली नावाची व्यक्ती आली होती. मृत्यूच्या १५ मिनिटे आधी तुनीषा अलीशी व्हिडीओ कॉलवर १५ मिनिटे बोलली होती. त्यामुळे शिजान नव्हे, तर अली हा तिच्या संपर्कात असल्याचा दावा अभिनेता शिजान खानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी सोमवारी वसई न्यायालयात केला. शिजानच्या जामिनावरील सुनावणीदरम्यान त्यांनी हा युक्तिवाद केला. यावरील बाजू मांडण्याचे काम अपूर्ण राहिल्याने पुढील सुनावणी ११ जानेवारीला होईल.
तुनीषा काही औषधे घेत होती. ती औषधे धोकादायक होती, असा दावाही त्यांनी न्यायालयात केला. तुनीषा- शिजानने ब्रेकअप झाल्यानंतरही त्यांच्यात मैत्रीचे संबध होते. ती टिंडर या डेटिंग ॲपवर सक्रिय होती. तेथे तिची अलीसोबत मैत्री झाली व ते तिच्या आईला माहीत होते. तुनीषा अलीसोबत डेटवरही गेली होती. २१ ते २३ डिसेंबरदरम्यान तुनीषा अलीशी बोलली. २३ डिसेंबरला तिने अलीच्या फोनवरून आईला व्हिडीओ कॉलही केला होता, असा दावा मिश्रा यांनी शिजानच्या वतीने केला. शिजान १० दिवसांपासून ठाण्याच्या मध्यवर्ती तुरुंगात आहे. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याने जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर युक्तिवाद सुरू आहे.
तुनीषाला शिजान उर्दू शिकवत असल्याच्या तिच्या आईच्या दाव्यात तथ्य नाही. शिजानला, त्याचा बहिणींना उर्दू येत नाही. शिजान जे उर्दू बोलतो, ते डायलॉग त्याच्या स्क्रिप्टमध्ये असतात. शिवाय तुनीषाला हिजाबची सक्ती केल्याचा आरोपही वस्तुस्थितीला धरून नाही. तिचे हिजाबचे फोटो हे मालिकेच्या शूटदरम्यानचे आहेत, असेही त्याचा वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. तुनीषाने तिचा सहकलाकार आणि मित्र पार्थला तिच्या समस्या सांगितल्या होत्या. जेव्हा शिजानला याची माहिती मिळाली, तेव्हा त्याने तुनीषाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि त्यांना याची माहिती दिली.
मुस्लीम असल्यामुळेच अटक केल्याचा दावा
शिजान मुस्लिम असल्यामुळेच त्याच्यावर लव्ह जिहादचे आरोप झाले. त्याला अटक करण्यात आली. तो मुस्लिम नसता तर अटक झाली नसती, असा दावाही त्याच्या वकिलांनी केला. त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत, तरीही लव्ह जिहादसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याची दोन दिवस चौकशी करण्यात आली, असे म्हणणे मिश्रा यांनी मांडले.
तुनीषा दुसऱ्याशी बोलते शिजानला कसे कळले?
शिजानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांच्या युक्तिवादानंतर तुनीषाचे वकील तरुण शर्मा यांनी बचाव पक्षाकडून काही कागदपत्रे सादर केली आहेत. याचे उत्तर देण्यासाठी थोडा वेळ लागेल, असे म्हणणे मांडले. त्यांनी न्यायालयाकडे ११ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली. आत्महत्येपूर्वी शिजान तुनीषाशी बोलला नाही, तर ती दुसऱ्याशी बोलत आहे, हे त्याला कसे कळले, असा सवाल त्यांनी केला. तुनीषाच्या आयफोनवरून पोलिसांना अद्याप ती कोणाशी बोलली, याचा शोध लावता आलेला नाही, याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.