जिल्हाभरात पाडव्यानिमित्त शोभायात्रा
By Admin | Published: March 29, 2017 04:54 AM2017-03-29T04:54:52+5:302017-03-29T04:54:52+5:30
ढोल ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर हातात भगवे झेंडे घेऊन आज जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यातील
पालघर : ढोल ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर हातात भगवे झेंडे घेऊन आज जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यातील गावागावात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शोभायात्रा निघाल्या होत्या. त्यांचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी रांगोळ््या घातल्या होत्या.
आपल्या पारंपरिक पेहरावात तरुणाई शोभा यात्रेत सहभागी झाली होती. मात्र शहरातील काही भागात शहरीकरणाच्या रेट्यामध्ये अनेक घरात गुढी उभारण्याची परंपरा पाळली गेली नव्हती.
सोशल मीडिया वरून या सणाच्या शुभेच्छांचा महापूर लोटला होता. यावेळी हातात ब्रह्मध्वज, फडकवत तरुणांची पथके संपूर्ण गावात फिरत होती. उन्हाचा तडाखा सकाळी ९ पासूनच तीव्रतेने जाणवत असला तरी शोभायात्रांच्या उत्साहावर त्याचा कोणताही परिणाम जाणवत नव्हता. वसई, विरार, डहाणू, पालघर, वाडा या शहरात जशा शोभायात्रा निघाल्या तशाच त्या जव्हार, मोखाडा,यासारख्या छोट्या गावातही शोभायात्रा निघाल्या. विशेष म्हणजे सर्व जाती-धर्माच्या बंधुभगिनींचा त्यामध्ये अत्यंत उत्साही असा सहभाग होता.
पालघर येथे संस्कार भारती आणि गुढी पाडवा शोभा यात्रा समितीच्यावतीने नववर्षाच्या स्वागता साठी ‘सूर पहाटेचे’ या कार्यक्रमाअंतर्गत गायिका कांचन राऊत, हेतवी सेठिया, संवादिनी साळुंखे यांनी आपल्या गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबला वादक पंकज आचार्य, बासरीवादक राजन सरमळकर यांनी साथ दिली. हुतात्मा स्तंभाकडून सकाळी ७ वाजता शोभा यात्रेला सुरुवात होऊन माहीम रस्त्यावरील लक्ष्मी नारायण मंदिरा जवळ या शोभायात्रेची सांगता झाली. या यात्रेत नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, बविआ चे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सेनेचे वैभव संखे, भूषण संखे इ. मान्यवर उपस्थित होते.
ढोल-ताशा, लेझीमनी वसई, विरार दुमदुमले
वसई : गुढीपाडवा आणि नववर्षाचे यंदा जंगी स्वागत झाले. सकाळपासूनच विविध भागात लहान-मोठया शोभायात्रा वाजत-गाजत निघाल्या होत्या. पारंपारिक वेशभूषा आणि मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या शोभायात्रांमधील ढोल-ताशे, लेझीम, नाचगाण्यांनी वसई दुमदुमली होती. शोभायात्रेत यंदा हत्ती, घोडे, उंट, बैलगाड्यांसह बाईकवर पारंपरिक वेशभूषा केलेल्या तरुण-तरुणी, महिला त्यांचे चिमुरडे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या.
विरार, नालासोपारा, नवघर-माणिकपूर, या शहरांसह अनेक गावांमध्ये सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. उन्हयाचे जोरदार चटके लागत असतानाही शोभायात्रेतील उत्साह तीळमात्रही कमी झाला नव्हता. यावेळी पुरुषांच्या बरोबरीने मराठी पेहरावातील तरुणी आणि महिलांचा मोटरसायकरलवरील रुबाब नजरेत भरत होता.
बोळींज येथील राम मंदिर, गोखीवरे येथील काशीविश्वेश्वर मंदिर आणि नायगाव कोळीवाडा येथील वाल्मिकेश्वर मंदिरातून बाईकवरून शोभायात्रा निघाल्या होत्या. या तीनही शोभायात्रा वसईच्या किल्ल्यात समाप्त झाल्या. शोभायात्रेत तीनशे बाईक आणि १० चारचाकी वाहने सहभागी झाली होती. वसई किल्ल्यात १०८ फुटी गुढी उभारून आणि चिमाजी आप्पांना मानवंदना देऊन शोभायात्रा समाप्त झाली. रंगीबेरंगी मराठमोळा पेशावाने शोभायात्रांमध्ये वेगळाच रंग भरला होता.
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे, नरवीर चिमाजी आप्पा, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई यासह अनेक जण मावळ््यांच्या वेशातही शोभायात्रेत सहभागी झाले होते. जय भवानी-जय शिवाजी, जय वज्राई-जय चिमाजी, भारत माती की जय, वंदे मातरम अशा जयघोषांनी व नाशिक ढोल पथकाच्या वादनाने वसई दुमदुमली होती.
विविध समाज पक्षांकडून आयोजन
सामवेदी ब्राम्हण समाजाच्यावतीने निर्मळ येथील शंकराचार्य मंदिरातून शोभायात्रा काढण्यात आली होती. नवघर-माणिकपूरमध्ये मराठा विकास सांस्कृतिक मंडळ आणि लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने शोभायात्रा काढण्यात आली होती. तर रमेदी ते पारनाका पर्यंतही मोठी शोभायात्रा काढण्यात आली होती.
नालासोपारा शहरात बहुजन विकास आघाडी आणि स्व. रमाकांत वैद्य ट्रस्टच्या वतीने तीन ठिकाणांहून शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. नालासोपाऱ्यातील मनसेच्यावतीने गुढीपाडव्यानिमित्ताने बाईक रॅली काढण्यात आली होती. तर विरारमध्येही बहुजन विकासआघाडीच्यावतीने शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या.