वसई-विरारकरांना ‘विजेचा शॉक’; पुढील चार-पाच दिवस आळीपाळीने वीजपुुरवठा राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 11:31 PM2020-02-03T23:31:10+5:302020-02-03T23:31:40+5:30
नालासोपारा उपकेंद्रातील रोहित्रात बिघाड
नालासोपारा : महापारेषण कंपनीच्या नालासोपारा पूर्व येथील धानीवबाग २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील १०० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्रामध्ये सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. यामुळे या रोहित्रावरील वीज ग्राहकांचा वीजभार इतर दोन रोहित्रांवर फिरविण्यात आला असून वसई, विरार व नालासोपारा शहरांतील नागरिकांना पुढील चार-पाच दिवस ‘विजेचा शॉक’ बसणार आहे. या तीनही शहरांतील काही भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस वीजपुरवठा गरजेनुसार आळीपाळीने बंद ठेवण्यात येणार आहे.
नालासोपारा उपकेंद्रातील रोहित्रात झालेल्या बिघाडामुळे तुळिंज, विजयनगर, रहमतनगर, निगनदास, बिलालपाडा भागात सकाळी साडेदहा ते साडेबारा या वेळात जवळपास ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. संतोष भुवन, वलईपाडा, बावशेत, तांडोपा, गौराईपाडा भागातील सुमारे ४५ हजार ग्राहकांची वीज सकाळी आठ ते साडेदहा दरम्यान बंद असेल.
नालासोपारा पश्चिम परिसरातील प्रगतीनगर, महेश पार्क भागातील अंदाजे १७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी नऊ ते साडेअकरापर्यंत बंद राहील. नारिंगी उपकेंद्रांतर्गत विरार पूर्वमधील साईनाथनगर, जीवदानी रोड, आशा तसेच विहार इंडस्ट्रीज, गोपचार भागातील जवळपास ३४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी साडेबारा ते दुपारी दोन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाईकपाडा उपकेंद्रांतर्गत तुंगारेश्वर रोड, नाईकपाडा, रेमी परिसरातील नऊ हजार ग्राहकांची वीज सायंकाळी साडेसहा ते साडेसातपर्यंत बंद असेल.
शिवभीम नगर, सातिवली नाका, बजरंग ढाबा ते सातिवली हायवे भागातील सुमारे ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सायंकाळी साडेसात ते रात्री आठ वाजेपर्यंत बंद असेल. पोमण उपकेंद्रांतर्गत कामणगाव, पोमनगाव, देवतळ, केआयडीसी, डोंगरीपाडा, मोरी, नागले, शिलात्तर भागात सुमारे सव्वाचार हजार ग्राहकांचा वीजपुरवठा रात्री साडेआठ ते साडेनऊ दरम्यान बंद राहील. शिरगाव उपकेंद्रांतर्गत वैतरणा, डोलीव, कोशिंबे, खर्डी भागात अंदाजे साडेसहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहील. दरम्यान, पुढील चार-पाच दिवस आवश्यकतेनुसारच वीज बंद ठेवण्यात येणार असून सोमवारी रात्री बहुतांश ठिकाणी वीज बंद ठेवण्याची गरज भासली नव्हती.
सहकार्याचे आवाहन
च्विरार पश्चिममधील तारांगण, फुलपाडा रोड, सहकार नगर परिसरातील सुमारे ३३ हजार ग्राहकांची वीज दुपारी दोन ते चार दरम्यान बंद राहील. तर पारोळ उपकेंद्रांतर्गत खानिवडे, सकवार, चांदीप, पारोळ, वज्रेश्वरी, गणेशपुरी भागातील अंदाजे साडेदहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सायंकाळी चार ते साडेसहा दरम्यान बंद असेल.
च्येत्या चार-पाच दिवसात दुरुस्ती होऊन परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून संबंधित परिसरातील वीज ग्राहकांना करण्यात आले आहे.